संतोष सावंत

(स्थळ : पाकिस्तानच्या संघाचे हॉटेल, दिनांक : ३० मे २०१९)

‘चीअर्स!’ म्हणत सर्व खेळाडूंनी आपापल्या हातातील प्याले उंचावले. उद्या त्यांची पहिली मॅच वेस्ट इंडिज संघासोबत होणार होती. कर्णधार सर्फराजने खेळाडूंसाठी ही खास पार्टी आयोजित केली होती. तेवढय़ात कोणी तरी दरवाजा ठोठावला. सर्वाच्या माना त्या दिशेने वळण्यापूर्वी शाहीन आफ्रिदी दरवाजावर जाऊन पोहोचलादेखील. त्याच्या मागे होते वहाब रियाझ आणि मोहम्मद हुसेन. सीसी टीव्हीत कोणीच दिसत नव्हते म्हणून मग ते दरवाजा उघडून बाहेर पडले. बाहेरही कोणीच नव्हते. ते पुन्हा आत आले आणि दरवाजा पुन्हा एकदा वाजला. कोणी तरी मुद्दाम त्रास देते आहे, अशी शोएब मलिकने त्यांची समजूत घातली आणि सगळे पेयपानात रमले. अचानक रूममधील लाइट्स गेले आणि त्याच वेळेस दरवाजाही वाजू लागला. फखर जमान आणि बाबर आझम यांनी धावत जाऊन दरवाजा उघडला आणि लाइट्स परत आले. याही वेळेस बाहेर कोणीच नव्हते.

‘‘चला, सेल्फी घेऊ या!’’ मोहम्मद हाफिज आणि इमाद वसिम दोघांनीही एकाच वेळी कल्पना मांडली. मोहम्मद आमिरने मोबाइल उचलला आणि सगळे जण त्या फ्रेममध्ये स्वत:ला बसवण्यासाठी धडपडू लागले; पण सेल्फी न काढताच किंचाळत त्याने फोन बाजूला टाकला. एसीच्या गारव्यातही त्याच्या कपाळावर चमकणारे घर्मबिंदू स्पष्टपणे दिसत होते. काय झाले असावे? यावर तर्कवितर्क सुरू झाले. हरिस सोहेलने त्याला पाणी आणून दिले. दोन घोट पिऊन तो म्हणाला, ‘‘मी त्याला पाहिला.’’.. सर्वानी एकदम विचारले, ‘‘कोणाला?’’ आमिर उत्तरला, ‘‘बॉ..बॉ.. बॉब वूल्मरला! तिथे डावीकडे उभा होता तो!’’ डावीकडे उभे असलेले शादाब खान आणि आसिफ अली चमकून उजवीकडे सरकले.

२००७ मध्ये विश्वचषकादरम्यान पाकिस्तानचे प्रशिक्षक बॉब वूल्मर यांच्या गूढ मृत्यूची घटना सर्वाना आठवली. वूल्मर हे इंग्लंडचे होते आणि तेवढे कारण वातावरण तंग करण्यासाठी पुरेसे होते. आता पुढे काय? असे भाव सर्वाच्या चेहऱ्यावर उमटले आणि पुन्हा एकदा लाइट्स गेले. आता दरवाजा वाजेल या अपेक्षेत ते असतानाच एक सावली भिंतीवरून वेगाने सरकत गेली. जवळपास सहा फूट उंचीच्या गुबगुबीत माणसाची ती सावली होती. कोणीही प्रतिक्रिया देण्यापूर्वीच लाइट्स आले, पण गोंधळ उडाला, कारण शोएब मलिक गायब झाला होता. अचानक असे कसे झाले? रूममध्येच शोधाशोध सुरू झाली. पुन्हा लाइट्स गेले आणि आले तेव्हा सगळेच चक्रवले. कारण गायब झालेला शोएब मलिक खुर्चीत बसून शांतपणे पेय रिचवत होता. त्याच्या म्हणण्यानुसार तो कधीपासून तिथेच बसलेला होता. भरपूर पेयपान आणि अशा धक्कादायक अनुभवांची मालिका त्यामुळे सारेच बधिर झाले होते. इथे कधीही काहीही भयानक घडू शकते. आपण आपल्या रूममध्ये परतलेले बरे! असा सुज्ञ विचार करून सगळ्यांनीच तिथून काढता पाय घेतला. त्यानंतर सर्फराजला रात्रभर स्वप्ने पडत राहिली. १९७५च्या विश्वचषकामधील ती मॅच. पाकिस्तानने वेस्ट इंडिजसमोर २६७ धावांचे आव्हान ठेवले होते. वेस्ट इंडिजची अवस्था ९ बाद २०३ अशी केली होती तरीही हा सामना पाकिस्तानने गमावला. त्या वर्षी विश्वचषक वेस्ट इंडिजनेच जिंकला होता. हीच मॅच त्याला पुन:पुन्हा दिसत होती, छळत होती. गंमत म्हणजे पाकिस्तान संघातील सर्वच खेळाडूंना रात्रभर असेच भयानुभव येत होते.

सकाळीच वेस्ट इंडिजचा संपूर्ण संघ सरावासाठी मैदानात उतरला. अपवाद होता तो फक्त ख्रिस गेल आणि आंद्रे रसेल यांचा! आदल्या रात्री उशिरापर्यंत हे दोघेही आपल्या रूमवर परतले नव्हते असे खात्रीलायक सूत्रांकडून समजले.

(पाकिस्तानच्या वेस्ट इंडिजकडून झालेल्या दारुण पराभवाची मनोरंजक चिकित्सा करणे, एवढाच या लेखाचा उद्देश आहे. बाकी भूतबित निव्वळ अंधश्रद्धा आहे.)