भारताच्या विशेष मुलांना अनेक वेळा दुर्लक्षित केले जाते आणि त्याचाच प्रत्यय चीन तैपेईमध्ये होणाऱ्या आशिया-पॅसिफिक क्रीडा स्पर्धेत सहभागी झालेल्या भारताच्या ४० खेळाडूंना बाबतीतही पाहायला मिळाला.

या स्पर्धेसाठी व्हिसा मिळविण्याच्या प्रतीक्षेत रस्त्यावरच रात्र काढावी लागली. या घटनेची सखोल चौकशी करण्याचे आदेश केंद्रीय क्रीडा मंत्रालयाने दिले आहेत.

क्रीडा मंत्रालयाची मान्यता असलेल्या मूकबधिरांच्या अखिल भारतीय क्रीडा परिषदेकडे विशेष मुलांच्या क्रीडा स्पर्धा व अन्य जबाबदारी सोपविण्यात आली आहे. भारतीय पथकातील ४० मुले व मुली चीन तैपेईमधील स्पर्धेत सहभागी झाले आहेत. व्हिसा मिळविण्यासाठी गुरुवारी ते तैपेईच्या कार्यालयात गेले होते. मात्र त्यांना व्हिसा मिळाला नाही. त्यामुळे त्यांना एका गुरुद्वाराबाहेरच संपूर्ण रात्र काढावी लागली.

या घटनेला जबाबदार असलेल्या संघटनेला तसेच भारतीय क्रीडा प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश देत क्रीडा मंत्री सर्बानंद सोनवाल यांनी सखोल चौकशी करण्याच्याही सूचना दिल्या आहेत.

क्रीडा प्राधिकरणाचे सरसंचालक इंजेटी श्रीनिवास यांनी ही घटना अत्यंत निंदनीय असल्याचे सांगितले. ते म्हणाले की, ‘‘या खेळाडूंची निवास व्यवस्था करण्याबाबत आम्हाला कोणीही कळविले नाही. जर आम्हाला ही व्यवस्था करण्यास सांगितले असते तर आम्ही निश्चित त्यांची व्यवस्था केली असती. आमच्यावर विनाकारण बोट दाखविले जात आहे. या घटनेस मूकबधिरांची अखिल भारतीय क्रीडा परिषदच जबाबदार आहे. यापूर्वी आम्ही त्यांना परदेशातील स्पर्धासाठी ५० लाख रुपयांचे अर्थसाहाय्य केले होते. मात्र अद्याप या रकमेबाबत त्यांनी तपशील व बिले दिलेली नाहीत.’’

ते पुढे म्हणाले की, ‘‘तैपेईच्या स्पर्धा संघटकांकडून कोणतेही लेखी निमंत्रण आलेले नसल्यामुळेच तैपेई दूतावासाने या खेळाडूंना व्हिसा नाकारला असल्याचे आम्हाला समजले. याबाबत आम्ही परराष्ट्र मंत्रालयाकडे संपर्क साधला आहे. अनेक तांत्रिक अडचणींमुळे व्हिसा मिळू शकला नाही असेही आम्हास सांगण्यात आले.’’