बीसीसीआयची विशेष सर्वसाधारण सभा आज; कोची टस्कर्स केरळ संघाच्या भरपाईचा मुद्दा चर्चेला येणार

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) सोमवारी नवी दिल्लीमध्ये होणाऱ्या विशेष सर्वसाधारण सभेमध्ये भविष्यातील क्रिकेट कार्यक्रम पत्रिकेची नव्याने आखणी तसेच आयपीएलमधील कोची टस्कर्स केरळ संघाला द्यावी लागणारी ८५० कोटी रुपयांची भरपाई या प्रमुख मुद्दयांवर चर्चा अपेक्षित आहे.

राजस्थान क्रिकेट असोसिएशनवर टाकण्यात आलेली सशर्त बंदी उठवण्याबाबत या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता असली तरी २०१९ ते २०२१ या कालावधीतील भारतीय क्रिकेटची कार्यक्रम पत्रिका निश्चित करणे, हा प्रमुख मुद्दा पटलावर असेल. मायदेशातील मालिकांसाठी ऑक्टोबर ते नोव्हेंबर आणि फेब्रुवारी ते मार्च हा कालावधी असण्याबाबत विशेष कार्यकारी अधिकारी (सीईओ) राहुल जोहरी यांच्या सूचनेवरही चर्चा होईल.

क्रिकेटच्या व्यग्र वेळापत्रकाबाबत कर्णधार विराट कोहलीने नाराजी व्यक्त केल्यानंतर वर्षभरात नेमके किती दिवस क्रिकेट खेळले जाईल, यावर कशी चर्चा होते आणि काय निर्णय होतो, याची उत्सुकता आहे. बीसीसीआयच्या काही पदाधिकाऱ्यांच्या मते, वरिष्ठ क्रिकेटपटूंनी विश्रांतीची मागणी केल्यास त्यांना परवानगी दिली जावी. मात्र किती दिवस क्रिकेट खेळले जावे, याचा विशेष हक्क मंडळाकडेच राहावा.

‘‘एका बाजूला क्रिकेटपटूंना वार्षिक करारामध्ये मोठी वाढ अपेक्षित आहे. दुसरीकडे त्यांना कमीतकमी क्रिकेट खेळायचे आहे. हे कसे शक्य आहे? सर्वच्या सर्व दौऱ्यांमध्ये किंवा मालिकांमध्ये खेळा, यासाठी क्रिकेट मंडळ कुठल्याही क्रिकेटपटूवर जबरदस्ती करत नाही. अतिक्रिकेट वाटत असेल तर विश्रांती घ्या,’’ असे बीसीसीआयच्या एका वरिष्ठ पदाधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले. क्रिकेट सामने खेळण्याच्या दिवसांची संख्या कमी करणे, हे अडचणीचे ठरू शकते, असेही त्यांनी सांगितले.

ते म्हणाले, ‘‘क्रिकेट खेळण्याच्या दिवसांची संख्या कमी केल्यास टीव्ही आणि डिजिटल प्रसारणकर्ते त्यानुसार पैसे अदा करतील. कोची टस्कर्सप्रकरणी आम्हाला ८५० कोटी रुपयांची भरपाई द्यावी लागणार आहे. ते पैसे कुठून आणणार? भविष्यातील दौऱ्यांची कार्यक्रमपत्रिका आणि क्रिकेटपटूंच्या मानधनामध्ये वाढ करण्याचे मुद्दे सर्वसाधारण सभेत मंजूर  केले जाऊ शकतात.’’

बीसीसीआयच्या काही सदस्यांच्या म्हणण्यानुसार, कोची संघाला सहज भरपाई देण्यापेक्षा त्या प्रकरणी पुढे दाद मागावी. इतकी मोठी रक्कम पाहता मंडळाने त्या विषयावर गांभीर्याने विचार करण्याची आवश्यकता आहे.

राजस्थान क्रिकेट असोसिएशनची सशर्त बंदी उठवण्याची शक्यता काही पदाधिकाऱ्यांनी बोलून दाखवली. याचप्रमाणे राष्ट्रीय उत्तेजक प्रतिबंधक संस्थेच्या (नाडा) क्रिकेटपटूंच्या उत्तेजक द्रव्य चाचणीसह काही परदेशी क्रिकेट मंडळांना आयपीएलसाठी हव्या असलेल्या बदलत्या कालावधीबाबत सर्वसाधारण सभेमध्ये चर्चा केली जाणार नाही, अशी माहिती बीसीसीआयच्या सूत्रांनी दिली.