*  रवींद्र जडेजाची अष्टपैलू चुणूक
*  धोनी, रैनाची अर्धशतके
*  भुवनेश्वर, आर. अश्विनची प्रभावी फिरकी
इंग्लंडविरुद्धची कसोटी मालिका आणि त्यानंतर पाकिस्तानविरुद्धची एकदिवसीय मालिका मायदेशात गमावणाऱ्या भारतीय संघावर जोरदार टीका होत होती. परंतु मसाल्यांच्या पदार्थासाठी विशेष ओळखल्या जाणाऱ्या कोचीमध्ये भारतीय संघाने इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात क्रिकेटरसिकांना विजयाची खमंग मेजवानी दिली. भारताचा विजयी पतंग अखेर झोकात आभाळात उडाला आणि कोचीमध्ये संघाने एक आगळा जल्लोष साजरा केला. भारताने दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात तब्बल १२७ धावांनी विजय मिळवला आणि पाच एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली.
भारताने प्रथम फलंदाजी करताना २८५ धावांचे अवघड आव्हान उभे केले. कप्तान महेंद्रसिंग धोनी आणि रवींद्र जडेजा यांनी अखेरच्या हाणामारीच्या षटकांमध्ये इंग्लिश गोलंदाजांवर हल्ला चढविल्यामुळेच ही धावसंख्या भारताला रचता आली. त्यानंतर भारतीय गोलंदाजांनी फक्त ३६ षटकांत इंग्लंड संघाला १५८ धावांत गुंडाळण्याची किमया साधली.
गौतम गंभीर (८) आणि अजिंक्य रहाणे (४) ही आघाडीची फलंदाजीची फळी तंबूत परतल्यानंतरही भारताने दमदार फलंदाजीचा प्रत्यय घडविला. सूर हरविलेल्या विराट कोहलीने आशादायी ३७ धावा काढल्या. धोनीने ६६ चेंडूंत ७२ धावांची तडाखेबंद खेळी साकारली. त्याला फक्त ३७ चेंडूंत तुफानी ६१ धावा काढणाऱ्या जडेजाने छान साथ दिली. धोनी-जडेजा यांनी सहाव्या विकेटसाठी ९६ धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी रचली. त्याआधी सुरेश रैना (५५) आणि युवराज सिंग (३२) यांनीही चांगली फलंदाजी केली.
नेहरू स्टेडियमवरील या सामन्याचे दुसरे सत्र गोलंदाजांसाठी फायदेशीर ठरले. भारतीय गोलंदाजांनी खेळपट्टीचा पुरता फायदा उचलत इंग्लिश संघाला गुंडाळले. केव्हिन पीटरसन याने सर्वाधिक ४२ धावा केल्या. नव्या दमाचा वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमारने इंग्लिश कर्णधार अ‍ॅलिस्टर कुक आणि पीटरसनचे बळी मिळवत भारताला विजयाचे स्वप्न दाखवले. भुवनेश्वरने २९ धावांत ३ बळी घेतले. त्यानंतर जडेजा (१२ धावांत २ बळी) आणि आर. अश्विन (३९ धावांत ३ बळी) यांनी आपल्या लाजवाब फिरकीच्या बळावर इंग्लिश फलंदाजांवर अंकुश ठेवला. जडेजाला सामनावीर पुरस्कार देण्यात आला. साठ हजारांहून अधिक क्रिकेटरसिकांची उपस्थिती असलेल्या या स्टेडियममध्ये मग विजयाचा जल्लोष साजरा झाला. दोन्ही संघ आता रांचीला रवाना होणार असून, १९ जानेवारीला उभय संघांत तिसरा एकदिवसीय सामना रंगणार आहे.
धावफलक
भारत : अजिंक्य रहाणे त्रि. गो. फिन ४, गौतम गंभीर त्रि. गो. डर्नबॅच ८, विराट कोहली झे. बेल गो. वोक्स ३७, युवराज सिंग पायचीत गो. ट्रेडवेल ३२, सुरेश रैना त्रिफळा गो. फिन ५५, महेंद्रसिंग धोनी झे. रूट गो. डर्नबॅच ७२, रवींद्र जडेजा नाबाद ६१, रविचंद्रन अश्विन नाबाद १, अवांतर : १५, एकूण : ५० षटकांत ६ बाद २८५
बाद क्रम : १-१८, २-१८, ३-७१, ४-११९, ५-१७४, ६-२७०
गोलंदाजी : स्टीव्हन फिन १०-१-५१-२, जेड डर्नबॅच ९-०-७३-२, ख्रिस वोक्स ९-०-६०-१, समित पटेल १०-०-४३-०, जेम्स ट्रेडवेल १०-०-४८-१, जो रूट २-०-५-०.
इंग्लंड : अ‍ॅलिस्टर कुक पायचीत गो. कुमार १७, इयान बेल झे. धोनी गो. अहमद १, केव्हिन पीटरसन त्रि. गो. कुमार ४२, जो रूट त्रि. गो. जडेजा ३६, ईऑन मॉर्गन झे. धोनी गो. कुमार ०, क्रेग किस्वेटर झे. रैना गो. अश्विन १८, समित पटेल नाबाद ३०, ख्रिस वोक्स पायचीत गो. जडेजा ०, जेम्स ट्रेडवेल पायचीत गो. अश्विन १, स्टीव्हन फिन झे. धोनी गो. अश्विन ०, जेड डर्नबॅच धावचीत २, अवांतर : ११, एकूण : ३६ षटकांत सर्व बाद १५८
बाद क्रम : १-४, २-५८, ३-७३, ४-७३, ५-११०, ६-१३२, ७-१३२, ८-१३५, ९-१३५, १०-१५८
गोलंदाजी : भुवनेश्वर कुमार १०-२-२९-३, शामी अहमद ४-१-२४-१, इशांत शर्मा ४-०-२८-०, रवींद्र जडेजा ७-१-१२-२, युवराज सिंग ४-०-१९-०, आर. अश्विन ७-०-३९-३.