स्टेडियममधील खेळाचे क्षण दोरीच्या साहाय्याने आकाशमार्गाने बारकाईने आणि जवळून टिपणाऱ्या ‘स्पायडर कॅम’ने सुरुवातीला जितके लक्ष वेधून घेतले, तितकाच तो वादग्रस्तही ठरला. भारताचा मर्यादित षटकांचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीने ‘स्पायडर कॅम’बाबत नेहमीच नाराजी प्रकट केली होती. मात्र आगामी ट्वेन्टी-२० विश्वचषकात ‘स्पायडर कॅम’ वापरण्यात येणार आहे. मात्र त्यामुळे खेळात कोणताही व्यत्यय येणार नाही, याची काळजी घेतली जाईल, अशी माहिती आयसीसीचे मुख्य कार्यकारी डेव्ह रिचर्ड्सन यांनी दिली.
‘‘होय, ट्वेन्टी-२० विश्वचषकात आम्ही ‘स्पायडर कॅम’ वापरणार आहोत. मात्र त्याच्या वापराने खेळात कोणताही अडथळा येणार नाही,’’ असे रिचर्ड्सन यांनी ट्वेन्टी-२० विश्वचषकाचे प्रायोजक ओप्पो मोबाइल्स यांनी आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात सांगितले.