क्रिकेट हा फलंदाजांचा खेळ म्हणून ओळखला जातो. ट्वेन्टी-२० क्रिकेट म्हणजे फलंदाजांसाठी कुरणच; पण त्यामुळे गोलंदाजांचे अस्तित्व नाकारता येऊ शकत नाही. त्यामुळे कोणताही संघ अकरा फलंदाजांशिवाय कधीच मैदानात उतरताना दिसत नाही. भारतातल्या खेळपट्टय़ा या फलंदाजीसाठी पोषक असल्या तरी त्या फिरकी आणि मध्यमगती गोलंदाजीसाठीही उपयुक्त समजल्या जातात; पण वेगवान गोलंदाजांना मात्र या विश्वचषकात चांगलाच घाम गाळावा लागेल. त्यामुळे गोलंदाजांची भूमिकाही या विश्वचषकात महत्त्वाची ठरणार आहे.

विश्वचषकाचे यजमानपद भारताकडे आहे. त्यामुळे त्यांना या खेळपट्टय़ांचा चांगलाच अंदाज असेल. त्याचबरोबर महेंद्रसिंग धोनीसारखा चाणाक्ष कर्णधार भारताकडे असून त्याला कोणत्या गोलंदाजाला कुठे वापरायचे, याचे ज्ञान चांगलेच अवगत आहे. फिरकीपटू आर. अश्विन हा या विश्वचषकात हुकमी एक्का ठरू शकतो. युवराज सिंग आणि रवींद्र जडेजा हे दोन्ही डावखुरे फिरकीपटू या विश्वचषकात उपयुक्त ठरू शकतात. २०११ साली झालेल्या विश्वचषकात युवराजची गोलंदाजी ही भारताची जमेची बाजू ठरली होती. स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कारही त्याच्याच नावावर होता. त्यामुळे युवराजकडून या वेळी मोठय़ा अपेक्षा असतील. जसप्रीत बुमराहच्या रूपात भारताला गुणी वेगवान गोलंदाज मिळाला आहे. त्याचा उपयोग धोनी कसा करतो, हे महत्त्वाचे ठरेल. आशीष नेहरा आणि हार्दिक पंडय़ा यांची गोलंदाजी कशी होते, हे पाहणे उत्सुकतेचे असेल. मोहम्मद शमी तंदुरुस्त झाल्यास त्याला संघात स्थान मिळेल का, हे पाहावे लागेल.

पाकिस्तानकडे मोहम्मद आमीर, मोहम्मद सामीसारखे दर्जेदार वेगवान गोलंदाज आहेत. संघाला ते सुरुवात कशी करून देतात, यावर त्यांच्या विजयाचे गणित ठरू शकते; पण पाकिस्तानकडे शाहिद आफ्रिदीसारखा नावाजलेला फिरकीपटू आहे. २०११च्या विश्वचषकात गोलंदाजीच्या जोरावर त्याने काही सामने संघाला जिंकून दिले होते. त्यामुळे आफ्रिदीच्या गोलंदाजीवर साऱ्यांचे लक्ष असेल. आफ्रिदीला या वेळी शोएब मलिकची साथ कशी मिळते, हे महत्त्वाचे असेल.

ऑस्ट्रेलियाने फार शिताफीने विश्वचषकातील गोलंदाज निवडले आहेत. शेन वॉटसन, जेम्स फॉकनर, मिचेल मार्श आणि ग्लेन मॅक्सवेल यांसारखे अष्टपैलू त्यांच्या गोलंदाजीमध्ये मोलाची भूमिका वठवतील. अ‍ॅश्टॉन अ‍ॅगरसारखा फिरकीपटू कदाचित त्यांना मोठे यश मिळवून देऊ शकणार नाही. न्यूझीलंडच्या संघात टीम साऊथी, ट्रेंट बोल्टसारखे वेगवान गोलंदाज आहेत, पण त्यांना खेळपट्टीची जास्त मदत मिळताना दिसणार नाही; पण नॅथम मॅक्क्युलमसारखा कामचलाऊ गोलंदाज त्यांच्यासाठी मोलाचा ठरू शकतो. दक्षिण आफ्रिकेने भारताला त्यांच्या मातीमध्ये ट्वेन्टी-२० मालिकेत धूळ चारली होती, यामध्ये त्यांच्या गोलंदाजीचाही मोलाचा वाटा होता. डेल स्टेन हा दुखापतग्रस्त असला तरी कॅगिसो रबाडासारखा युवा वेगवान गोलंदाज त्यांना चांगले यश मिळवून देऊ शकतो. फिरकीपटू इम्रान ताहिरने आतापर्यंत साऱ्यांनाच प्रभावित केले आहे, त्यामुळे त्याची गोलंदाजी संघासाठी महत्त्वाची ठरेल.

श्रीलंकेचा कर्णधार लसिथ मलिंगा हे श्रीलंकेचे प्रमुख अस्त्र मानले जात असले तरी गेल्या काही सामन्यांमध्ये त्याला प्रभाव टाकता आलेला नाही; पण नुवान कुलसेकरा, अँजेलो मॅथ्यूज आणि थसारा परेरा यांच्या मध्यमगती माऱ्यावर श्रीलंकेचे भवितव्य अवलंबून असेल. त्याचबरोबर फिरकीपटू रंगना हेराथची गोलंदाजी महत्त्वाची ठरेल. इंग्लंड संघातील मध्यमगती गोलंदाजांना जास्त अनुभव असल्याचे दिसून येत नाही; पण कामचलाऊ फिरकीपटू मोइन अलीची चार षटके इंग्लंडसाठी फार महत्त्वाची असतील. ख्रिस जॉर्डन आणि लिआम प्लंकेट यांच्याकडे थोडा फार अनुभव असला तरी भारतामध्ये गोलंदाजी करण्याची मानसिकता त्यांना पक्की करून यावी लागेल. वेस्ट इंडिजच्या संघात सुनील नरिन नसणे हे फार दुर्दैवी आहे, कारण तो त्यांच्यासाठी हुकमी एक्का ठरू शकला असता. आयपीएलमध्ये त्याने हे सिद्धही करून दाखवले आहे. वेस्ट इंडिजकडे चांगले वेगवान गोलंदाज आहेत, पण त्यांचा जास्त प्रभाव पडेल असे वाटत नाही; पण ड्वेन ब्राव्होसारखा अष्टपैलू आपल्या गोलंदाजीच्या अनुभवाने प्रतिस्पध्र्यासाठी आव्हान उभे करू शकतो. फिरकीपटू सुलेमान बेन जास्त प्रभाव पाडू शकेल, असे वाटत नाही.

भारतातील खेळपट्टय़ांचा विचार करता वेग आणि स्विंग यांचे जास्त महत्त्व विश्वचषकात दिसून येणार नाही; पण फिरकी आणि मध्यमगती गोलंदाजी मात्र संघाला विजयाचा मार्ग दाखवू शकते. त्यामुळे संघांनी उपयुक्त अशा फिरकी आणि मध्यमगती गोलंदाजीवर विसंबून राहणे योग्य ठरेल.