इंडियन प्रीमियर लीगचे (आयपीएल) आयोजन सध्या भारतीय क्रिकेट नियामक मंडळासाठी (बीसीसीआय) महत्त्वाचा मुद्दा बनला आहे. कोणत्याही परिस्थितीत यंदा ‘आयपीएल’चे आयोजन करण्यासाठी ‘बीसीसीआय’ आग्रही आहे. पण यजमानपदाच्या हक्कावरून ‘बीसीसीआय’मध्ये विविध गट पडले आहेत. भारतातच ‘आयपीएल’चे आयोजन करण्यासाठी काही जण आग्रही असले तरी गरज पडल्यास देशाबाहेर ही स्पर्धा खेळवण्याची काहींची तयारी आहे.

‘‘भारतातच ही स्पर्धा खेळवण्यात आल्यामुळे करोनामुळे उद्भवलेल्या आर्थिक संकटातून बाहेर पडण्यास देशाला मदत होईल, असा एक मतप्रवाह आहे. मात्र गरज पडल्यास, भारताबाहेर आयपीएलचे आयोजन करण्यास काहींनी होकार दर्शवला आहे. त्यामुळे ‘बीसीसीआय’मधील निर्णय घेणाऱ्यांमध्ये ३ विरुद्ध २ असे गट पडले आहेत. भारतातच ही स्पर्धा झाल्यास, आम्हाला परदेशात प्रवास करण्याची गरज भासणार नाही. स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी आम्ही नवी मार्गदर्शक तत्त्वे जाहीर करू. तसेच देशातच ही स्पर्धा घेतल्यास, चाहत्यांमध्येही आमच्याविषयी देशप्रेमाची भावना निर्माण होईल, असेही काहींचे म्हणणे आहे,’’ असे ‘बीसीसीआय’च्या एका पदाधिकाऱ्याने सांगितले.

‘‘आयपीएलचे कोणत्याही परिस्थितीत आयोजन करण्याला अनेकांनी पहिली पसंती दर्शवली असून गरज पडल्यास, कोणताही निर्णय घेण्यासाठी ते तयार आहेत. खेळाडूंचे आरोग्य तसेच सुरक्षितता याला आमचे पहिले प्राधान्य असून लवकरच स्पर्धेविषयीच्या सर्व पर्यायांचा विचार करून वेळापत्रकाची आखणी केली जाईल,’’ असेही त्यांनी सांगितले.

एका फ्रँचायझीच्या पदाधिकाऱ्याने सांगितले की, ‘‘भारतामध्येच आयपीएलचे आयोजन झाल्यास जगाला एक वेगळा संदेश देता येईल. त्याचबरोबर देशातील परिस्थिती पूर्वपदावर येण्यास मदत होईल. परदेशात मात्र खर्च अधिक होईल. आमच्यासाठी तसेच बहुतेक सर्व संघांसाठी भारत हाच योग्य पर्याय आहे, असे मला वाटते.’’ आता ‘आयपीएल’च्या आयोजनावरून परदेशी खेळाडूही आपले मत व्यक्त करू लागले असून क्रिकेट ऑस्ट्रेलियाने ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात होणारी ट्वेन्टी-२० विश्वचषक स्पर्धा आयोजित करण्यास असहमती दर्शवली आहे.

चेन्नई सुपर किंग्सचा वेगवान गोलंदाज दीपक चहर म्हणाला की, ‘‘आयपीएलद्वारे क्रिकेट मोसमाला सुरुवात होईल, अशी आशा आहे. हळूहळू देशातील परिस्थिती सुधारत असून आयपीएल हे क्रिकेट मोसम सुरू करण्याचे योग्य व्यासपीठ आहे, असे मला वाटते. आयपीएलनंतर अनेक खेळाडू एकदिवसीय किंवा कसोटी क्रिकेट खेळण्यासाठी मोकळे होतील. त्यामुळे त्यांच्यावरील ताण हलका होईल. आयपीएलमुळे गोलंदाजांनाच नव्हे तर जगभरातील क्रिकेटपटूंना आपली लय मिळवण्यासाठी फायदा होणार आहे. मात्र आयपीएलला सुरुवात होण्यासाठी योग्य सराव शिबिराची आवश्यकता आहे.’’

आयपीएलमध्ये खेळण्यासाठी मी उत्सुक आहे. ट्वेन्टी-२० विश्वचषक स्पर्धेऐवजी आयपीएलचे आयोजन यंदा होईल, अशी शक्यता आहे. प्रदीर्घ विश्रांतीनंतर आयपीएलमध्ये खेळायला मला आवडेल. आयपीएलमुळे ऑस्ट्रेलिया दौऱ्यापूर्वी आत्मविश्वास परत मिळवण्यासाठी मदत होईल.

कुलदीप यादव, भारताचा फिरकीपटू