एक वर्ष लांबणीवर टाकण्यात आलेल्या टोक्यो ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेला प्रायोजक मिळतील की नाही याबाबत भारताचा अनुभवी टेनिसपटू लिएण्डर पेसने शंका व्यक्त केली आहे. त्याच वेळेस करोनाच्या संकटातून सावरल्यावर पुनरागमन करण्याचा विश्वासही गेल्या आठवडय़ात ४७व्या वर्षांत पदार्पण करणाऱ्या पेसने व्यक्त केला आहे.

‘‘माझ्या कारकीर्दीत यंदाचा ऑलिम्पिक आठवा आहे. यंदाचे २०२० हे माझे कारकीर्दीतील अखेरचे वर्ष असल्याचे याआधीच मी स्पष्ट केले होते. मात्र आता २०२१ मध्ये टोक्यो ऑलिम्पिक होणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. त्यातच आर्थिक मंदी जगभरात मोठय़ा प्रमाणात आहे. या मंदीत ऑलिम्पिकचे प्रायोजक टिकतील का याबाबत मला शंका वाटते, ’’ असे पेसने सांगितले. जोपर्यंत करोनावर लस सापडत नाही तोपर्यंत ऑलिम्पिकचे आयोजन होणे अशक्य असल्याचे पेसने म्हटले.

‘‘जपानकडून ऑलिम्पिकचे आयोजन कशा प्रकारे होणार आहे हा प्रश्नच आहे. त्यातच जर प्रेक्षकांशिवाय ऑलिम्पिक खेळवावी लागली तर अवघड आहे. कारण प्रेक्षक नसले तर महसूल मिळणार नाही. या सर्व बाबींचा विचार करावा लागेल. खेळ हा सध्याच्या काळात मोठा व्यवसाय झाला आहे. नावाजलेल्या खेळाडूंवर करोडो रुपये खर्च होत असतात. मात्र सध्याची मंदी ही प्रायोजक ऑलिम्पिककडे वळतील का याबाबत शंका उपस्थित करते,’’ असे पेसने सांगितले.

फुटबॉल लीगना जगभरात सुरुवात झाली असली तरी जरी एखादा नामांकित खेळाडू करोनाग्रस्त झाला तरी त्याचा मोठा परिणाम होईल, याकडेही पेसने लक्ष वेधले. ‘‘रोनाल्डो, मेसीसारखे मोठे खेळाडू जर करोनाबाधित झाले तर ते खेळासाठीही मोठे संकट असेल. आता तर त्यांनी खेळ सुरू केला आहे, ते सर्व खेळाडू एकमेकांच्या दैनंदिन संपर्कात येत आहेत. जोपर्यंत लस येत नाही तोपर्यंत व्यावसायिक खेळाडूला करोनाचा धोका पोहोचण्याची शक्यता नाकारता येत नाही,’’ असे पेसने सांगितले.

पुनरागमनानंतर नव्या रूपात दिसेन!

‘‘गेल्या वर्षी सप्टेंबरमध्येच मी टेनिसमधून निवृत्त होणार होतो. मात्र टाळेबंदी लागू झाल्यानंतर गेल्या ९३ दिवसांमध्ये मला वडिलांसोबत वेळ घालवता आला आहे. कारकीर्दीत प्रथमच मला घरातल्यांना इतका वेळ देता आला. भरपूर वाचन करण्याची संधी या काळात मला मिळाली आहे. जेव्हा टाळेबंदी संपेल तेव्हा टेनिस खेळाकडे वळेन. त्यावेळेस मी नव्या रूपात युवा खेळाडूप्रमाणे दिसेन,’’असे पेसने सांगितले.