‘अप्पू’ म्हटले की छोटय़ाशा गमत्या हत्तीचे रूप डोळ्यांसमोर उभे राहते. १९८२मध्ये दिल्लीत झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेचा हा शुभंकर. अप्पूच्या बरोबरीने चाहत्यांसाठी आणखी एका कारणासाठी ही स्पर्धा प्रेक्षणीय ठरली. रंगीत टीव्हीद्वारे कार्यक्रम प्रक्षेपित होण्याची मुहूर्तमेढ याच सोहळ्याद्वारे रोवली गेली. घरबसल्या रंगीत टेलिव्हिजन संचावर दिल्लीत झालेल्या या स्पर्धेचा आनंद समस्त भारतीयांनी घेतला. भारतीय क्रीडा प्रक्षेपण बाजाराची ही शैशवावस्था. त्या वेळी सरकारच्या नियंत्रणात असलेला प्रक्षेपणाचा पसारा आता ३२ वर्षांनी खासगी क्रीडा वाहिन्यांच्या कक्षेत आला आहे. हजारांच्या गोष्टी आता कोटी आणि अब्जावधींच्या गलेलठ्ठ करार रकमेत परावर्तित झाल्या आहेत. ‘भारतीय क्रीडा प्रक्षेपण बाजार’ हा अर्थकारणाचा अविभाज्य घटक झाला आहे. विश्वचषकाच्या निमित्ताने सोनी सिक्स या मल्टिस्क्रीन मीडिया समूहातील वाहिनीने या बाजारात जोरदार मुसंडी मारली आहे. फुटबॉल विश्वचषकासारख्या जगव्यापी स्पर्धेच्या प्रक्षेपणाचे हक्क मिळवत सोनी सिक्सने अन्य वाहिन्यांवर कुरघोडी करत बाजी मारली आहे. परंतु प्रक्षेपणात मात्र या वाहिनीने कमालीची निराशा केली आहे.
१९८२ सालच्या आशियाई क्रीडा स्पर्धेच्या आयोजनाची जबाबदारी भारताला मिळाली. प्रतिष्ठेच्या या स्पर्धेच्या आयोजनामुळे दिल्ली शहराचे रूपडेच पालटले. गचाळ, गर्दी अशी ओळख असलेल्या दिल्लीत फ्लायओव्हर, शिस्तबद्ध सिग्नल यंत्रणा यांचे आगमन झाले. मात्र त्याच वेळी भारतीयांना या स्पर्धेचा आनंद कृष्णधवल पडद्यावर घ्यावा लागणार होता. कारण तोपर्यंत भारतात रंगीत टेलिव्हिजन संचांचे आगमनच झाले नव्हते. त्या काळातही आकारमानाने लहान असलेल्या श्रीलंकेत रंगीत टीव्हीने पाय रोवले होते. मात्र केंद्र सरकारच्या आणि विशेषकरून तत्कालीन केंद्रीय माहिती आणि प्रसारणमंत्री वसंत साठे यांच्या पुढाकाराने रंगीत टीव्हींच्या आगमनाची प्रक्रिया राबवण्यात आली. तब्बल एक लाख रंगीत प्रक्षेपण दाखवू शकणाऱ्या टीव्ही संचांचे भारतात आगमन झाले. रंगांच्या माध्यमातून तंत्रज्ञानानेही बढती मिळवली. १९८२मध्येच टीव्ही ट्रान्समीटरच्या संख्येने पस्तिशीवरून शंभरी गाठली. समस्त भारतीयांनी पहिल्यांदा रंगीत पडद्यावर क्रीडा स्पर्धेचा थरार अनुभवला.
यानंतरचा बहुतांशी काळ क्रीडा स्पर्धाचे प्रक्षेपण प्रसार भारतीच्या माध्यमातून होत होते. मात्र प्रेक्षकांना आकर्षून घेणाऱ्या संकल्पनांचा अभाव, प्रक्षेपणातल्या गफलती आणि एकंदरितच अनुत्साह यामुळे प्रचंड क्षमता आणि कार्यक्षेत्र व्यापक असूनही प्रसार भारतीला खेळ पाहण्याची संकल्पना रुजवण्यात अपयशच आले. सरकारी योजनेचा भाग म्हणून क्रीडा क्षेत्राला वाहिलेली डीडी स्पोर्ट्स वाहिनीही सुरू करण्यात आली. मात्र कधीही ही वाहिनी क्रीडा प्रक्षेपणाचा चेहरा ठरू शकली नाही, उलट प्रक्षेपण कसे नसावे याचे उत्तम उदाहरण ती बनल्याने, तिचे अस्तित्वही नावापुरते उरले आहे.
१९९४ साली ‘ईएसपीएन-स्टार स्पोर्ट्स’ या क्रीडा प्रक्षेपणातल्या मातब्बर समूहाचे भारतात आगमन झाले. इंडियन प्रीमिअर लीग या बहुचर्चित स्पर्धेचे उद्गाते असलेले ललित मोदी हे त्या प्रक्रियेचा भाग होते. भारतातले क्रिकेटचे वेड लक्षात घेऊन त्यांनी सुरुवातीला त्यानुसार धोरण आखले. सामना सुरू होण्यापूर्वी आणि संपल्यानंतर विश्लेषणात्मक कार्यक्रम, अत्याधुनिक कॅमेऱ्यांद्वारे चित्रण, संगणकाद्वारे ग्राफिक्स, समालोचन कक्षात माजी खेळाडूंचा मोठा ताफा, जाहिरातींसाठी केलेले स्लॉट्स आणि त्याची विक्री अशा शिस्तबद्ध यंत्रणेच्या माध्यमातून त्यांनी भारतीय प्रेक्षकांना खेळ पाहण्याची गोडी लावली. क्रिकेटमध्ये मक्तेदारी स्थापित केल्यानंतर त्यांनी अन्य खेळांकडे मोर्चा वळवला.
यादरम्यान ‘झी स्पोर्ट्स’ या नव्या वाहिनीचे आगमन झाले. मात्र भारतात क्रिकेट नियंत्रित करणाऱ्या बीसीसीआयशी झालेल्या वादाचा फटका या वाहिनीला बसला. झी समूहाने सुरू केलेल्या इंडियन क्रिकेट लीगला बंडखोर ठरवण्यात आल्याने झी स्पोर्ट्सला क्रीडा प्रक्षेपण बाजारापेठेत पाय रोवणे कठीण होऊन बसले. दुबईस्थित टेन समूह आणि निम्बस कम्युनिकेशनच्या ‘निओ स्पोर्ट्स’ने या बाजारात उडी घेतली. या दोन समूहांनी टप्प्याटप्प्याने आपला परिघ विस्तारला. मात्र त्यांची धाटणी औपचारिक राहिली. खेळाला मनोरंजनाना तडका देण्याची शक्कल सोनीच्या ‘सेट मॅक्स’ने प्रथम राबवली. २००३ची विश्वचषक क्रिकेट स्पर्धा क्रिकेटपेक्षा मंदिरा बेदीच्या नयनरम्य पेहरावांनीच गाजली. क्रिकेटच्या जोडीला गाणे, नृत्य, वात्रटिका अशा गोष्टींची जोड देत ‘क्रिकेटेन्मेंट’ ही पॅकेजरूपी संकल्पना भारतात रूढ झाली. २००८पासून सुरू झालेल्या आयपीएल स्पध्रेने चाहत्यांची अचूक नस पकडली.
२००७मध्ये संसदेने स्पोर्ट्स क्रीडा प्रक्षेपण विधेयकाला मान्यता दिली. यानुसार राष्ट्रीय महत्त्व असलेल्या खेळांच्या सामन्यांच्या प्रक्षेपणाचे फीड खासगी वाहिन्यांनी दूरदर्शन आणि ऑल इंडिया रेडिओला देणे बंधनकारक करण्यात आले. यामुळे खासगी वाहिन्या उपलब्ध नसणाऱ्या बहुसंख्य जनतेला खेळांचे सामने पाहणे सहज शक्य झाले, मात्र त्याच वेळी सरकार केवळ कायद्याच्या चौकटीचा आधार घेणार आणि प्रक्षेपणाच्या स्पर्धात्मक लढतीत उतरणार नसल्याचेही या निमित्ताने स्पष्ट झाले.
सायना नेहवाल, सानिया मिर्झा, अभिनव बिंद्रा, गगन नारंग या क्रिकेटेत्तर क्रीडापटूंच्या यशामुळे प्रक्षेपणात क्रिकेटपल्याड विचार होऊ लागला. अन्य खेळांमध्ये आयपीएलच्या धर्तीवर लीग स्वरूपाच्या स्पर्धा सुरू झाल्याने क्रीडा प्रक्षेपणाला नवा आयाम मिळाला आहे. प्रत्येक स्पर्धा व्यावसायिक समीकरणांची नांदी आहे. ईसपीएनशी फारकत झाल्यानंतर स्टार समूहाने भारतातील क्रिकेट प्रक्षेपणाचे अधिकार मिळवले. सहा वर्षांसाठी ३८५१ कोटी एवढय़ा प्रचंड रकमेचा हा करार आहे. प्रत्येक सामन्यासाठी स्टार समूह बीसीसीआयला ४० कोटी रुपये अदा करणार आहे. तब्बल चार वाहिन्या ताफ्यात असणारा हा समूह घोडदौड करत असताना ‘सोनी सिक्स’ या वाहिनीने फुटबॉल विश्वचषकाचे हक्क मिळवत प्रतिस्पध्र्यावर कुरघोडी केली आहे. विशेष म्हणजे २०१८ची विश्वचषक, युरो स्पर्धा यांचेही हक्क राखत सोनी सिक्सने स्वतंत्र अस्तित्व प्रस्थापित केले आहे. ‘कॅफे रिओ’ या विश्लेषणात्मक कार्यक्रमाचा साधारण दर्जा असूनही सोनी सिक्सने टीआरपीच्या युद्धात अन्य क्रीडा वाहिन्यांवर मात केली आहे. कोलकात्यामधील फुटबॉलची लोकप्रियता लक्षात घेऊन या समूहाने ‘सोनी आथ’ या समूहातील बंगाली वाहिनीवर सामन्याचे बंगाली समालोचन उपलब्ध केले आणि हा प्रयोग यशस्वी झाला आहे. या महासोहळ्याच्या माध्यमातून १०० कोटींचा गल्ला होण्याची वाहिनीला अपेक्षा आहे.
लुइस सुआरेझने घेतलेला चावा असो किंवा लिओनेल मेस्सीने केलेला अद्भुत गोल दिवाणखान्यात बसून जगाच्या दुसऱ्या कोपऱ्यात घडणाऱ्या या थराराचा आनंद घेण्याची संधी या वाहिन्यांनी दिली आहे. सरकारी ते खासगी अशा विस्तारलेल्या या आर्थिक डोलाऱ्याला फुटबॉल विश्वचषकाच्या निमित्ताने वेगळे परिमाण लाभले आहे हे नक्की.