कोल्हापूर : पुढील २०२४ च्या ऑलिम्पिकपर्यंत नोकरीपेक्षा खेळालाच प्राथमिकता असणार आहे, असे मत कोल्हापूरची आंतरराष्ट्रीय नेमबाजपटू राही सरनोबत हिने बुधवारी व्यक्त केले.

टोकिओ ऑलिम्पिकमध्ये सहभागी झालेली राही येथील घरी परतली. तिने बुधवारी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. यावेळी राहीचे वडील जीवन सरनाेबत, भाऊ आदित्य सरनोबत, राजेंद्र सरनोबत आदी उपस्थित होते.

टोकिओ ऑलिम्पिकचा अनुभव कथन करताना राही म्हणाली, करोनामुळे मुळातच ही स्पर्धा एक वर्षे उशिरा सुरु झाल्याचा मोठा परिणाम खेळाडूंवर झाला. पुन्हा नव्याने तयारी करावी लागली. या अनुभवाचा सकारात्मक फायदा नक्कीच खेळाडूंना होईल. भारतीय नेमबाज संघाच्या प्रशिक्षकांनी खेळाडूंकडून उत्तम कामगिरीसाठी सर्वोतोपरी प्रयत्न केल्याचा माझा अनुभव राहिला आहे, असा उल्लेख करून तिने जर्मनीचे पंच मुखबयार यांची कमतरता जाणवल्याचे नमूद केलं.

नव्याने सुरुवात

पुढील ६ महिने कोणत्याही स्पर्धेत सहभागी होणार नाही. १ सप्टेंबरपासून सरावाची सुरुवात करणार. चुका, त्रुटीमध्ये सुधारणा करून पाया भक्कम करणार. शारीरिक, मानसिक दृष्ट्या खंबीर होवून सराव दुप्पटीने करून जानेवारीपासूनच ऑलिम्पिक पात्रता फेरीत सर्वोच्च कामगिरीची तयारी करणार आहे. नेमबाजीतील यशस्वी कामगिरीची दखल घेऊनच राज्य शासनाने नोकरी दिली आहे. शासनाकडून आवश्यक पाठबळ मिळत असले, तरी काहीबाबतीत उशीर होतो. तरीही खेळाकडे दुर्लक्ष करून नोकरीकडे लक्ष देणं योग्य वाटत नाही, असं राहीने स्पष्ट केले.