दिलीप वेंगसरकर, माजी कर्णधार

वाडेकर यांच्या नेतृत्वाखाली १९७१मध्ये परदेशात कसोटी मालिका जिंकण्याचा पराक्रम गाजवला. इंग्लंड आणि वेस्ट इंडिजला त्यांच्या देशांमध्ये पराभूत करण्याचे कर्तृत्व भारताने त्यावेळी दाखवले होते, त्यावेळी मी शाळेत होतो. त्यांचे हे विजय आमच्यासाठी प्रेरणादायी ठरले. एक आक्रमक फलंदाज म्हणून त्यांची ओळख होती. मुंबईच्या क्रिकेटसाठी त्यांचे योगदान खूप मोठे आहे.

१९६० ते ७० या दशकात शिवाजी पार्क जिमखाना आणि दादर युनियन या दोन संघांमधील मैदानावरील हाडवैर हे सर्वश्रुत होते. त्यावेळी दोन्ही संघांमधून मातब्बर क्रिकेटपटू खेळायचे. मी १९७४-७५च्या काळात क्लब क्रिकेट खेळलो. त्यावेळी ही ठस्सन पाहायला मिळायची नाही. पण मी लहानपणी खूप सामने पाहिले आहेत. कांगा लीगमध्येसुद्धा ही लढत रंगत दिसायची. अजित वाडेकर, विजय मांजरेकर, रमाकांत देसाई, पॅडी शिवलकर हे शिवाजी पार्क जिमखान्याकडून खेळायचे. सुनील गावस्कर, रामनाथ पारकर, वासू परांजपे, अमर वैद्य, आदी दादर युनियनकडून खेळायचे. हे सामने पाहायला आठ-दहा हजार क्रिकेटरसिकांची गर्दी व्हायची. हल्ली रणजी सामन्यांनासुद्धा अशी गर्दी पाहायला मिळत नाही.

दिलदार मित्र गमावला!

चंदू बोर्डे, माजी कर्णधार

मैदानावर व मैदानाबाहेर भावाप्रमाणे प्रेम करणारा जिवलग मित्र गमावला. अजित वाडेकर हे केवळ माझ्या एकटय़ासाठी नव्हे तर त्यांच्या सर्वच सहकाऱ्यांसाठी ते अजातशत्रू मित्र होते.

सामन्यातील परिस्थितीनुसार कधी आक्रमक तर कधी संयमी व चिवट फलंदाजी करण्याबाबत वाडेकर हे नावाजलेले फलंदाज होते. त्यामुळे त्यांची फलंदाजी नेहमीच संघासाठी फायदेशीर असायची. त्याचबरोबर ते डावखुरे फलंदाज असल्यामुळे त्यांच्या शैलीत आकर्षक नजाकता होती. स्लीपमध्ये क्षेत्ररक्षण करण्यात त्यांचे चापल्य अतुलनीय होते. आपल्या अव्वल दर्जाच्या क्षेत्ररक्षणाच्या जोरावरही त्यांनी अनेक सामन्यांमध्ये संघास विजयश्री खेचून आणण्यात सिंहाचा वाटा उचलला होता. त्यांच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने वेस्ट इंडिजविरुद्ध मालिका जिंकली होती. तेव्हा भारतीय संघाची मुंबईत मोठी मिरवणूक काढण्यात आली होती. वाडेकर यांनी इंग्लंडविरुद्धही मालिका विजय मिळवून दिला होता.

स्थानिक स्तरावरही त्यांच्या नेतृत्वाखाली मुंबई संघाने रणजी, दुलीप करंडक अशा अनेक स्पर्धा जिंकल्या होत्या. संघातील नवोदित खेळाडूंना प्रोत्साहन व मार्गदर्शन करण्याची त्यांच्याकडे वृत्ती होती. त्यांच्या नेतृत्वाखाली अनेक युवा खेळाडू तयार झाले. ते जरी मितभाषी असले तरी संघातील अनावश्यक गंभीर वातावरण एखादा किस्सा किंवा विनोद सांगून हलके करण्यात ते माहीर होते. मिळून मिसळून वागण्याच्या शैलीमुळे ते लोकप्रिय होते. अतिशय हुशार व नैपुण्यवान असल्यामुळे त्यांनी बँकिंग क्षेत्रातही अनेक मोठय़ा जबाबदाऱ्या सहजपणे पार पाडल्या होत्या. त्यांच्या निधनामुळे क्रिकेट क्षेत्राने दिलदार व्यक्तिमत्त्व गमावले आहे.

क्रिकेटमधील आदर्श व्यक्तिमत्त्व हरपले!

पद्माकर ऊर्फ पॅडी शिवलकर, माजी क्रिकेटपटू

‘‘पॅडी, मी चूक केली. तुला इंग्लंड दौऱ्यावर न्यायला हवे होते,’’ हे दौऱ्याहून परतल्यानंतर अजितचे शब्द मला आजही आठवतात. १९७४मध्ये भारतीय संघ अजितच्या नेतृत्वाखाली इंग्लंड दौऱ्यावर गेला होता. त्यावेळी भारताने तिन्ही कसोटी सामन्यांत हार पत्करली होती. दुसऱ्या कसोटीत भारताचा डाव फक्त ४२ धावांत आटोपला होता. भारताच्या खराब कामगिरीचे खापर कर्णधार म्हणून अजितवर फुटले होते. त्यामुळे या दौऱ्यानंतर त्याने क्रिकेटमधून निवृत्ती पत्करली.

परदेशात कसे जिंकायचे, हे अजितने कर्णधार म्हणून दाखवून दिले. विशेषत: १९७१च्या वेस्ट इंडिज दौऱ्यात भारताने पराक्रम गाजवून कसोटी मालिका जिंकली होती. या मालिकेत सुनील गावस्कर, दिलीप सरदेसाई आणि एकनाथ सोलकर या फलंदाजांनी तो दौरा गाजवला होता. गावस्कर एक मोठा फलंदाज म्हणून त्या दौऱ्यातच उदयास आला होता.

माणूस म्हणून तो एक खंबीर, खंदा व्यक्ती आणि फलंदाज होता. मनात काही तरी विचार चालू आहे, हे त्याच्याकडे पाहिले की सहज लक्षात यायचे. स्वभाव म्हणाल तर मनातले सर्व काही तो कधीच सांगायचा नाही. मात्र जे काही ठरवले असेल, ते करताना दिसायचा. जिंकण्याचा आनंद प्रत्येकाला असतो, हरता-हरता सामना जिंकल्याचा आनंद तर उत्स्फूर्त असतो. परंतु हरण्याचे नैराश्य त्याच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसायचे. हे मला जाणवले. क्रिकेटकडे तो निष्ठेने पाहायचा. प्रयत्न न सोडण्याची त्याची वृत्ती मला खूप आवडायची. क्रिकेटमधील एक आदर्श व्यक्तिमत्त्व हरपले, याचे दु:ख अपार आहे.

शिवाजी पार्क जिमखान्याचे त्या काळात सर्व क्रिकेट स्पर्धामध्ये वर्चस्व असायचे. त्या सुवर्णकाळात अजितसोबत त्या यशात भागीदार होण्याचे भाग्य मला लाभले. संघात एकापेक्षा एक मातब्बर फलंदाज असल्यामुळे आमच्यासारख्या तळाच्या फलंदाजांना फलंदाजीची संधी कधीच मिळायची नाही. मैदानावरसुद्धा त्याची प्रयोगशीलता प्रकर्षांने जाणवायची. क्रिकेटच्या शिस्तीत आणि नियमांत राहून खेळाकडे पाहण्याचा चांगला दृष्टिकोन त्याच्याकडे होता.