X

क्रीडा – संक्षिप्त

भारताची क्रमवारीत अव्वल स्थानी झेप.. धरमशाला : इंग्लंडविरुद्धची एकदिवसीय मालिका ३-२ अशी जिंकत भारतीय संघाने आयसीसी क्रिकेट क्रमवारीत पुन्हा एकदा अव्वल स्थानी झेप घेतली.

जॉन राइट मुंबई इंडियन्सचे मुख्य प्रशिक्षक
मुंबई : भारताचे माजी प्रशिक्षक जॉन राइट यांची मुंबई इंडियन्स संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. न्यूझीलंडच्या राइट यांनी २०००-२००५ या कालावधीत भारतीय संघाचे तर २०१०-२०१२ दरम्यान न्यूझीलंड संघाचे प्रशिक्षकपद भूषवले होते. मागील हंगामात प्रशिक्षकपदी असणारे रॉबिन सिंग यंदाही मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात असणार आहेत.

भारताची क्रमवारीत अव्वल स्थानी झेप
धरमशाला : इंग्लंडविरुद्धची एकदिवसीय मालिका ३-२ अशी जिंकत भारतीय संघाने आयसीसी क्रिकेट क्रमवारीत पुन्हा एकदा अव्वल स्थानी झेप घेतली. मालिकेआधी भारतीय संघ क्रमवारीत ११७ गुणांसह तिसऱ्या स्थानी होता. ही मालिका जिंकत भारतीय संघाने १२० गुणांसह प्रथम स्थान पटकावले. तीन वर्षांच्या कालावधीनंतर भारतीय संघ अव्वल स्थानी विराजमान झाला आहे. दरम्यान इंग्लंड संघाच्या गुणांमध्ये १२१ वरून ११७ अशी घसरण झाली आहे.

डी.वाय. पाटील अ-रिलायन्स १ यांच्यात अंतिम लढत
नवी मुंबई : डी. वाय. पाटील ट्वेन्टी-२० क्रिकेट स्पर्धेत डी. वाय. पाटील अ संघ आणि रिलायन्स अ संघांमध्ये अंतिम लढत होणार आहे. शोएब शेखच्या ४८ धावा आणि अनुपम संकलेचा याच्या ५ बळींच्या जोरावर डी. वाय. पाटील अ संघाने पश्चिम रेल्वेवर ४ विकेट्सनी मात केली. पश्चिम रेल्वेने प्रथम फलंदाजी करताना १२८ धावा केल्या. डी. वाय. पाटील अ संघाने हे लक्ष्य ६ विकेट्सच्या मोबदल्यात पूर्ण केले. रिलायन्स १ संघाने एअर इंडियावर ३० धावांनी विजय मिळवला. रिलायन्स १ संघाने १८४ धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल एअर इंडियाला १५४ धावांचीच मजल मारता आली.

कॅरम : मुंबई महानगरपालिकेला दुहेरी जेतेपद
मुंबई : मुंबई जिल्हा कॅरम संघटना आणि ब्राह्मण सेवा मंडळ यांच्यातर्फे आयोजित २२व्या मुंबई जिल्हा अजिंक्यपद स्पर्धेत मुंबई महानगरपालिका संघाने दुहेरी जेतेपदावर नाव कोरले. पुरुष सांघिक गटाच्या ब गटाच्या लढतीत मुंबई महानगरपालिकेने एअर इंडियावर ३-० अशी मात केली. क गटाच्या लढतीत मुंबई महानगरपालिका क संघाने बीईएसटी ड संघाचा ३-० असा धुव्वा उडवला.

कुस्ती : नरसिंग यादव, अवधेश यादव विजयी
मुंबई : मुंबई शहर-उपनगर तालीम संघातर्फे आयोजित आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत नरसिंग यादव आणि अवधेश यादव यांनी आपापल्या लढती जिंकत जेतेपदावर नाव कोरले. राष्ट्रकुल सुवर्णपदक विजेता नरसिंग यादवने अझरबैजानच्या विश्वकॅडेट विजेता पाता बाक्युराडझेला २-०, ४-० असे पराभूत केले. अवधेश यादवने कोबा काकालाडझेला १-०, ४-२ असे नमवले. जॉर्जियाचा विश्वविजेता लेवन बेरिआनिड्झेने भारताचा अव्वल मल्ल जोगिंदर सिंगवर मात केली. मुकेश आणि कांतीलाल जाधव लढत बरोबरीत सुटली.

शिवशंकर, मुंबई पोलिस जिमखान्याला जेतेपद
मुंबई : सुभाष उत्कर्ष मंडळातर्फे आयोजित राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेत ठाण्याच्या शिवशंकरने पुरुषांमध्ये तर महिलांमध्ये मुंबई पोलिस जिमखान्याने जेतेपद पटकावले. शिवशंकरने मुंबई शहरच्या विजय क्लबचे आव्हान १८-१६ असे संपुष्टात आणले.सूरज बनसोडे, सोमनाथ कोळी, नीलेश साळुंखे विजयाचे शिल्पकार ठरले. मुंबई महिला पोलिस जिमखाना संघाने शिवशक्तीवर १३-१२ अशी मात केली. गौरी वाडेकर आणि पौर्णिमा जेधे यांनी सुरेख खेळ केला.

24
READ IN APP
X