देशातील नावाजलेली क्रीडा प्रशिक्षण संस्था स्पोर्ट्स ऑथोरिटी ऑफ इंडिया (साई) च्या केंद्रांमध्ये काजू-बदामाचा भ्रष्टाचार झाल्याच्या अनेक तक्रारी आल्यानंतर क्रीडा मंत्रालयाने चौकशीचे आदेश दिले आहेत. साईची देशभरात अनेक प्रशिक्षण केंद्रे आहेत. या केंद्रांमधील खेळाडूंनी आपल्याला सुकामेवा आणि फळे मिळत नसल्याची तक्रार केली. निनावी तक्रारी आल्यानंतर देशातील एकूण १८ प्रशिक्षण केंद्रांची चौकशी व्हावी असे आदेश क्रीडा मंत्रालयाने क्वालिटी काउंसिल ऑफ इंडियाला दिले आहेत.

‘न्यूट्रीशन कोट्या’तून ५० टक्के रक्कम ही खेळाडूंना मिळत नाही. तेथील प्रशिक्षक आणि कर्मचारी हे भ्रष्टाचार करत असल्याची तक्रार सातत्याने क्रीडा मंत्रालयाला मिळाली. या केंद्रामधील खेळाडू कुस्ती, गोळाफेक इत्यादी खेळांसाठी प्रशिक्षण घेतात. आपल्याला पुरेसा पोषक आहार मिळत नसल्याची तक्रार त्यांनी केली होती. निनावी तक्रारी असल्या तरी आम्ही तातडीने कारवाई केली आहे असे अधिकाऱ्यांनी सांगितले. केवळ हाच भ्रष्टाचार नव्हे तर या केंद्रांच्या एकूणच कारभाराचे अंकेक्षण व्हावे असे क्रीडा मंत्रालयाने क्वालिटी काउंसिलला सांगितले आहे.

स्पोर्ट्स ऑथोरिटी ऑफ इंडियाची देशामध्ये एकूण ५६ क्रीडा केंद्रे आहेत. त्यामध्ये ५,३९४ खेळाडू प्रशिक्षण घेतात. त्यापैकी १,५८७ मुली आहेत. काजू आणि बदामाला खेळाडूंच्या आहारात विशेष महत्त्व असते. कुस्ती, बॉक्सिंग या खेळांचा सराव करणाऱ्या खेळाडूंच्या आहारात काजू आणि बदामाचा समावेश असावा असे आहारतज्ज्ञांचे मत आहे.

येथे खेळणाऱ्या प्रत्येक खेळाडूच्या आहारावरील खर्चासाठी सरकारकडून पुरेसा निधी येतो. आहारतज्ज्ञ आणि प्रशिक्षक यांच्या संमतीने येथील मेनू ठरवला जातो. प्रत्येक खेळाडूच्या वयोगटानुसार आणि क्रीडा प्रकारानुसार आहार ठरवला जातो. त्यानंतर, केटरिंग व्यवस्थापकाला आहाराचे नियोजन करण्याचे सांगितले जाते. परंतु, काही ठिकाणी क्रीडा प्रशिक्षक, अधिकारी आणि व्यवस्थापक हे भ्रष्टाचार करतात असे आढळून आले आहे.

मोठ्या खेळाडूंच्या आहारात भ्रष्टाचार होत नाही असे आढळून आले असल्याचे एका अधिकाऱ्याने इंडियन एक्स्प्रेसला म्हटले. कारण मोठे खेळाडू त्यांच्या आहाराबद्दल जागरुक असतात. परंतु छोट्या वयोगटातील खेळाडूंना त्यांच्या आहाराबाबतची माहिती नसते. खेळाडूला आठवड्याला ५०० ग्राम बदाम मिळणे अनिवार्य आहे. काही ठिकाणी खेळाडूंना केवळ २५० ग्राम बदाम मिळाल्याचे उदाहरण सापडले आहे. त्यामुळे चौकशीचे आदेश देण्यात आले आहे.