सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये क्रीडा स्पर्धाना सुरुवात होईल, अशी आशा आहे. जेणेकरून करोनाच्या संकटानंतर लोकांचा आत्मविश्वास उंचावण्यास मदत होईल, असे केंद्रीय क्रीडामंत्री किरेन रिजिजू यांनी सांगितले.

मे महिन्याच्या अखेरीस क्रीडामंत्र्यांनी ऑलिम्पिकशी संबंधित काही खेळांची सराव शिबिरे सुरू करण्यास परवानगी दिली आहे. ‘‘भविष्यात लवकरच क्रीडा स्पर्धाना सुरुवात होईल. ठरावीक मर्यादा आखून योग्य कार्यप्रणालीसह काही स्पर्धाचे आयोजन करण्यासाठी सरकारकडून परवानगी दिली जाईल. विशेष सराव सत्रांमध्ये ऑलिम्पिकसाठी पात्र ठरलेले खेळाडू सराव करत आहेत, याचा मला आनंद आहे,’’ असे रिजिजू यांनी सांगितले.

राष्ट्रकुल देशांच्या परिषदेदरम्यान रिजिजू यांनी करोनानंतर भारताच्या क्रीडा कार्यक्रमांना कशी सुरुवात करता येईल, याबाबतची माहिती दिली. ते म्हणाले की, ‘‘सर्व राज्ये आणि केंद्र शासित प्रदेशाच्या क्रीडामंत्र्यांशी चर्चा करून मी हळूहळू क्रीडाविषयक घडामोडी सुरू करण्यास सांगितले आहे. काही खेळांच्या लीग सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये सुरू करण्यात येतील.’’

टाळेबंदीदरम्यान खेळाडूंसाठी सुरू असलेले ऑनलाइन सराव कार्यक्रम तसेच कौशल्य विकास वाढीबद्दल ते म्हणाले, ‘‘विविध स्तरावरील हजारो खेळाडूंना तसेच प्रशिक्षकांना या ऑनलाइन कार्यक्रमांचा फायदा झाला आहे. गेल्या वर्षी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘फिट इंडिया’ चळवळ सुरू केली होती. करोनाशी लढा देताना त्याचा चांगला फायदा होत आहे. त्याचबरोबर टाळेबंदीच्या काळात स्वत:ची तंदुरुस्ती आणि रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी ही चळवळ उपयुक्त ठरत आहे.’’