केंद्रीय क्रीडामंत्री राज्यवर्धनसिंह राठोड यांनी खडसावले

खेळाडूंना आर्थिक निधी व अन्य सवलती देण्याबाबत क्रीडा खात्यामधील अधिकाऱ्यांकडून कामचुकारपणा दिसून आला तर वेळप्रसंगी त्यांच्यावर बडतर्फीची कारवाई करण्यास मी मागेपुढे पाहणार नाही. आमच्या खात्याबाबत कोणीही विनाकारण टीका करू नये, असे केंद्रीय क्रीडामंत्री राज्यवर्धनसिंह राठोड यांनी सांगितले.

राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत पदक विजेत्या खेळाडूंचा राठोड यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. त्या वेळी ते म्हणाले, ‘‘भारतीय खेळाडूंसाठी आर्थिक निधीची कमतरता नाही. मात्र या निधीचा योग्य कारणास्तव उपयोग केला जाईल याची काळजी खेळाडू व संघटनांनी घेतली पाहिजे. भारतीय क्रीडा प्राधिकरण व केंद्रीय क्रीडा मंत्रालयातील सर्व सहकाऱ्यांना खेळाडूंच्या अडचणी त्वरेने सोडविण्याचे आदेश देण्यात आले आहेत. एखाद्या पदाधिकाऱ्याबाबत अनेक वेळा तक्रारी येत असतील तर त्याच्यावर कारवाई केली जाईल. खेळाडूंना वेळेवर आर्थिक सहकार्य व सानुग्रह अनुदान दिले जाईल, अशी खबरदारी आम्ही घेत असतो.’’

खेळाडू किंवा संघटकांनी आमच्या खात्याबाबत आरोप किंवा टीका करण्यापूर्वी त्याची शहानिशा केली पाहिजे, असे सांगून राठोड म्हणाले, ‘‘मध्यंतरी शासनाकडून मंजूर झालेला निधी मिळाला नसल्याची तक्रार एका खेळाडूकडून करण्यात आली होती. त्याने थेट माझ्याकडे तक्रार केल्यानंतर मी संबंधित अधिकाऱ्यावर कारवाईही करणार होतो. मात्र सखोल चौकशी केल्यावर असे लक्षात आले की, संबंधित खेळाडूला एका वर्षांपूर्वीच आर्थिक निधी देण्यात आला आहे.’’

‘‘भारतीय ऑलिम्पिक असोसिएशनकडून (आयओए) भरपूर सहकार्य मिळत आहे. त्यांच्या कारभारात लक्षणीय सुधारणा झाली आहे. विविध खेळांच्या राष्ट्रीय संघटनांच्या कार्यपद्धतीतही सुधारणा होत आहे. आम्ही नेहमीच आयओए व विविध राष्ट्रीय संघटनांचे समाधान होईल असा प्रयत्न करीत असतो. मात्र या संघटनांनी शासनाकडून दिल्या जाणाऱ्या प्रत्येक पैशाचा खेळाडूंच्या हितासाठीच विनियोग होईल अशी काळजी घेतली पाहिजे,’’ असेही राठोड यांनी सांगितले.

सत्कार समारंभास एम.सी.मेरी कोम, सुशीलकुमार, सायना नेहवाल, पी.व्ही.सिंधू, मीराबाई चानू, नीरजकुमार, मनू भाकेर, अनीष भानवाला, जितू राय आदी खेळाडू उपस्थित होते.

पंतप्रधान मोदींकडून गौरव

भारतीय खेळाडूंनी राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत मिळविलेले यश देशातील प्रत्येक नागरिकास अभिमान वाटावे असेच आहे. त्यांच्या यशात त्यांचे कुटुंबीय, सहकारी स्टाफ यांनी केलेल्या अथक परिश्रमाचा मोठा वाटा आहे, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रकुल पदक विजेत्या खेळाडूंचा गौरव केला. पदक विजेत्या खेळाडूंनी मोदी यांची भेट घेतली. त्या वेळी मोदी म्हणाले,‘‘मेरी कोमचे यश अनेक नवोदित खेळाडूंसाठी प्रेरणादायक आहे. प्रशिक्षक पुल्लेला गोपीचंद यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय बॅडमिंटनपटू मिळवत असलेले यश खरोखरीच कौतुकास्पद आहे. खेळाडूंनी आपल्या गुरू, पालक व आदर्श खेळाडूंवर विश्वास ठेवीत त्यांच्याकडून शिकवणीची शिदोरी घेतली पाहिजे.’’