बार्सिलोना खुल्या टेनिस स्पर्धेत भारताचा रोहन बोपण्णा आणि त्याचा पाकिस्तानचा साथीदार ऐसाम उल हक कुरेशी जोडीचे आव्हान उपांत्यपूर्व फेरीत संपुष्टात आले. अव्वल मानांकित नेनाद झेम्नोझिक-डॅनियल नेस्टर जोडीने बिगरमानांकित भारत-पाकिस्तानच्या जोडीवर ६-७(७), ७-५, १०-७ असा विजय मिळवला. बोपण्णाच्या पराभवामुळे स्पर्धेतील भारताचे आव्हानही संपुष्टात आले आहे. दरम्यान, एकेरी प्रकारात राफेल नदाल आणि केई निशिकोरी यांनी बार्सिलोना खुल्या टेनिस स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत आगेकूच केली. जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी असणाऱ्या राफेल नदालने इव्हान डोडिगवर ६-३, ६-३ असा सहज विजय मिळवला. पुढील फेरीत त्याचा मुकाबला स्पेनच्या निकोलस अल्माग्रोशी होणार आहे.  

मर्वन अटापट्टू श्रीलंकेचा प्रभारी प्रशिक्षक
कोलंबो : माजी कर्णधार मर्वन अटापट्टूची श्रीलंकेच्या प्रभारी प्रशिक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. पॉल फारब्रेस यांनी प्रशिक्षकपदाचा राजीनामा दिल्याने अट्टापटूवर ही जबाबदारी सोपवण्यात आली आहे. फारब्रेस मुख्य प्रशिक्षक असताना अट्टापटू फलंदाजी प्रशिक्षक सल्लागार म्हणून कार्यरत होते. माजी खेळाडू रुवान कल्पगेची क्षेत्ररक्षण प्रशिक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. गेल्या चार वर्षांतील अटापट्टू श्रीलंकेच्या संघाचा सातवा प्रशिक्षक असणार आहे. श्रीलंकेच्या आर्यलड आणि इंग्लंड दौऱ्यासाठी या दोघांवर प्रशिक्षकपदाची जबाबदारी असणार आहे.

क्रिकेट : शिवाई क्रिकेट क्लब अजिंक्य
मुंबई :  क्रिकेट इंडिया अकादमीतर्फे आयोजित १२ वर्षांखालील प्रीमिअर लीग स्पर्धेत शिवाई क्रिकेट क्लबने कांदिवली क्रिकेट क्लबवर मात करत जेतेपद पटकावले. प्रथम फलंदाजी करताना शिवाई क्रिकेट क्लबने १४१ धावांची मजल मारली. जगदीश सुवर्णाने सर्वाधिक ३७ धावा केल्या. कांदिवली क्लबतर्फे परिक्षत धनकने सर्वाधिक ३ बळी घेतले. प्रत्युत्तरादाखल खेळताना कांदिवली क्रिकेट क्लबला १२८ धावाच करता आल्या. सौरभ सिंगने २४ धावा केल्या. शिवाईतर्फे विशाल गावित आणि अजित यादव यांनी प्रत्येकी २ बळी घेतले. २५ धावा आणि २ बळी घेत अष्टपैलू कामगिरी करणाऱ्या अजित यादवला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले. शिवाई क्लबच्याच श्रेयस मंडलिकची सामनावीर पुरस्कारासाठी निवड करण्यात आली.

बुद्धिबळ : अधिबनच्या पदकाच्या आशा कायम
शारजा : भारताच्या बी. अधिबनने आशियाई बुद्धिबळ स्पर्धेत कझाकिस्तानच्या रिनात जुमाबायेव्ह याच्यावर आकर्षक विजय मिळवित आठव्या फेरीअखेर दुसऱ्या स्थानावर झेप घेतली आहे. त्याचे आता सहा गुण झाले आहेत. अभिजित कुंटेने चीनच्या वान युनगोह याच्यावर मात करीत आपली गुणसंख्या पाचवर नेली. महिलांमध्ये ईशा करवडेने पाच गुणांसह पदकाच्या आशा राखल्या आहेत. भारताच्या सौम्या स्वामीनाथन हिने इराणच्या दोर्सा देराखाशानी हिच्यावर सफाईदार विजय मिळविला. स्वाती घाटेने आपलीच सहकारी मेरी अ‍ॅन गोम्स हिच्यावर विजय मिळविला व साडेचार गुणांवर झेप घेतली.   

उन्हाळी बुद्धिबळ प्रशिक्षण शिबीर
मुंबई : डॉ. प्रकाश वझे क्रीडा प्रतिष्ठानतर्फे उन्हाळी बुद्धिबळ प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. मुलुंड, ठाणे, डोंबिवली, कल्याण, दादर, बोरिवली आणि विरार येथे ही शिबिरे होणार आहेत. नवोदित, अर्धप्रगत आणि प्रगत अशा गटांमध्ये हे शिबिर होणार आहे. अधिक माहितीकरिता डॉ. प्रकाश वझे ९९२०१४८८०६/ ९८२०११४८८०६ या क्रमांकावर संपर्क करावा.

मुंबईच्या दोघांना मँचेस्टर युनायटेडच्या प्रशिक्षणाची संधी
मुंबई : देशातील सर्वात मोठय़ा एअरटेल रायझिंग स्टार्स उपक्रमाअंतर्गत ११ युवा फुटबॉलपटूंची मँचेस्टर युनायटेड सॉकर स्कूलतर्फे प्रशिक्षणासाठी निवड झाली आहे. सनथ वल्लाडर्स, अक्रम खान (मुंबई), अर्का दे, रजीब रॉय (कोलकाता), मोहम्मद अकीब, करण खुराणा (दिल्ली), प्रेमचंद सिंग, नीरज सिंग (बंगळुरू), लिस्टन कोलाको आणि जोलिटन डायस (गोवा), राकेश के (हैदाराबाद) या खेळाडूंची प्रशिक्षणासाठी निवड करण्यात आली आहे. याच स्वरुपाचा उपक्रम बांगलादेश आणि श्रीलंकेतही राबवण्यात आला होता. या देशातून निवडण्यात आलेले खेळाडू प्रशिक्षणाचा भाग असतील. निवड झालेले भारतीय खेळाडू २६ एप्रिलला मँचेस्टरसाठी रवाना होणार आहेत.  

मावळी मंडळातर्फे राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा
मुंबई : मावळी मंडळ, ठाणेतर्फे ८९व्या शिवजयंतीच्या उत्सवानिमित्त ६३व्या राज्यस्तरीय पुरुष आणि महिला गटाच्या कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. २७ एप्रिल ते १ मे या कालावधीत ही स्पर्धा रंगणार आहे. पुरुष गटात ५० तर महिला गटात २२ अव्वल संघ सहभागी होणार आहेत. पुरुषांमध्ये उत्कर्ष क्रीडा मंडळ, नवरत्न क्रीडा मंडळ, बंडय़ा मारुती, होतकरू मित्र मंडळ यांच्यात जेतेपदासाठी चुरस रंगणार आहे. महिला गटात शिवशक्ती मंडळ, टागोर नगर, स्फुर्ती सेवा मंडळ, मुंबई पोलिस जिमखाना, शिवतेज क्रीडा मंडळ हे जेतेपदासाठी शर्यतीत आहेत.

कबड्डी : विकास, स्नेहसागर उपांत्य फेरीत
मुंबई : ओम ज्ञानदीप मंडळातर्फे आयोजित द्वितीय श्रेणी स्थानिक ब-गट कबड्डी स्पर्धेत विकास, स्नेहसागर, विद्यासागर संघांनी उपांत्य फेरीत आगेकूच केली. प्रभादेवीच्या विकास संघाने उत्कंठावर्धक लढतीत ५-५ चढायांच्या जादा डावात दादरच्या विजय बजरंग क्रीडा मंडळावर ३८-३३ असा विजय मिळवला. सौरभ भुवडचा अष्टपैलू खेळ विकासच्या विजयाचे वैशिष्टय़ ठरले. स्नेहसागरने अमर सुभाषला ४४-२६ असे नमवले. प्रसाद म्हात्रे आणि मनीष अगबुले हे या विजयाच चमकले. विद्यासागरने संस्कृती प्रतिष्ठानवर २५-२२ अशी निसटती मात केली. प्रॉमिस संघाने विहंगचा ३३-२२ असा पराभव केला. प्रॉमिसकडून तुषार आडिवरेकर आणि हेमंत बांदकर यांनी शानदार खेळ केला.

हॉकी : दपूम रेल्वे-साइ यांच्यात अंतिम लढत
नागपूर : नागपूरच्या दक्षिण पूर्व मध्य रेल्वेने पोम्पोशच्या स्पोर्ट्स होस्टेलचा आणि सुंदरगडच्या भारतीय क्रीडा प्राधिकरणाच्या (साइ) संघाने महाराष्ट्र इलेव्हनचा पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश केला. आता दक्षिण पूर्व मध्य रेल्वे आणि साइ यांच्यात व्हीएचए-नागपूर सुवर्णचषक हॉकी स्पध्रेची अंतिम लढत रंगणार आहे. दपूम रेल्वेने उपांत्य फेरीच्या सामन्यात पोम्पोशच्या स्पोर्ट्स होस्टेलला ४-१ अशा गोलफरकाने पराभूत केले.  सुंदरगडच्या साइने महाराष्ट्र इलेव्हनला १-०ने पराभूत केले.

स्नूकर : पांडय़ा, गुरबक्षानीचे आव्हान संपुष्टात
मुंबई : रेडिओ क्लबतर्फे आयोजित अखिल भारतीय खुल्या स्नूकर स्पर्धेत सुश्रुत पंडय़ा आणि आणि क्रेइश गुरबक्षानी यांचे आव्हान संपुष्टात आले. रेडिओ क्लबच्या जय माखिजाने हिंदू जिमखान्याच्या सुश्रुत पंडय़ावर ११४-७४, ९८-९० असा विजय मिळवला. अर्जुन राघनानीने क्रेइश गुरबक्षानीला १००-११७, ११६-८८, १०९-७१ असे नमवले. बदार करिमीने कौस्तुभ कुपेरकरचा ११४-९२, ११३-१०० असा पराभव केला. चंदू कनसोडिराने भूषण शहाडेवर ९४-७९, ९८-९३ असा विजय मिळवला. चेतन हेमाडीने अटीतटीच्या रंगलेल्या सामन्यात राजेश मेहरोत्रावर १०५-९१, ११५-७६ अशा फरकाने विजय प्राप्त केला.