अमर हिंद, वडू नवघर तिसऱ्या फेरीत
क्रीडा प्रतिनिधी, ठाणे
श्री मावळी मंडळ, ठाणे आयोजित ६३व्या राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेत पुरुष गटात वेताळ क्रीडा मंडळ, काल्हेर ठाणे, अमर हिंद क्रीडा मंडळ, वडू नवघर, बंडय़ा मारुती तर महिला गटात संकल्प क्रीडा मंडळ, शिवनेरी क्रीडा मंडळ यांनी तिसऱ्या फेरीत आगेकूच केली.
वडू नवघर, भिवंडी संघाने मुंबई उपनगरच्या टागोर नगर मित्र मंडळावर ३६-३० असा ६ गुणांनी विजय मिळवला. वडू नवघरतर्फे जितेश पाटील, सुरण म्हात्रे यांनी आक्रमक खेळ करत संघाच्या विजयात निर्णायक भूमिका बजावली. होतकरू मित्र मंडळाने मुंबई शहरच्या वंदे मातरम क्रीडा मंडळाचा १३-११ असा पराभव केला. मध्यंतराला ६-६ अशी बरोबरी होती. होतकरूच्या पंकज म्हात्रेने बहारदार चढाया करून संघाला विजय मिळवून दिला.
वीर परशुराम कबड्डी संघाने ज्वलंत स्पोर्ट्स क्लबवर ३४-३१ अशी ३ गुणांनी मात केली. विजय स्पोर्ट्स क्लबने हुतात्मा शांताराम क्रीडा मंडळाचा १८-४ असा धुव्वा उडवला. छत्रपती शिवाजी क्रीडा मंडळ, डोंबिवलीने शिवाजी स्पोर्ट्स क्लबवर ५०-२५ असा दणदणीत विजय मिळवला.
महिला गटात मुंबई उपनगरच्या शिवनेरी क्रीडा मंडळाने उपनगरच्याच टागोर नगर मित्र मंडळाला ४४-३६ असे ८ गुणांनी नमवले. वैशाली महाडिकच्या आक्रमक चढायांमुळे शिवनेरीला शानदार विजय मिळवून दिला. अन्य लढतीत ठाण्याच्या संकल्प क्रीडा मंडळाने उपनगरच्या अंजनी क्रीडा मंडळाचा २०-१२ असा पराभव केला. कविता सावंतचा अष्टपैलू खेळ संकल्पच्या विजयाचे वैशिष्टय़ ठरले.

सुप्रिय मोंडल युवा ऑलिम्पिकसाठी पात्र
पीटीआय, नवी दिल्ली
दुबई येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय जलतरण अजिंक्यपद स्पर्धेमध्ये सुप्रिय मोंडलने २०० मी. बटरफ्लाय विभागात सुवर्णपदकाची कमाई केली असून या कामगिरीमुळे सुप्रियने २०१४ मध्ये होणाऱ्या युवा ऑलिम्पिकसाठी पात्र होण्याचा मान पटकावला आहे.
१७ वर्षीय सुप्रियने २०० मी. बटरफ्लाय स्पर्धा २:०३.९३ सेकंदांमध्ये पूर्ण करत सुवर्णपदक पटकावत चीनमध्ये ऑगस्ट महिन्यात होणाऱ्या युवा ऑलिम्पिकसाठीचे स्थान निश्चित केले. यापूर्वीही सुप्रियने काही स्पर्धामध्ये पदके पटकावली होती.
‘‘युवा ऑलिम्पिमध्ये खेळण्याचे माझे स्वप्न सत्यात उतरले आहे. माझ्या स्वप्नापर्यंत पोहोचण्यासाठी माझे प्रशिक्षक आणि पालकांनी जो मला पाठिंबा दिला त्यासाठी मी त्यांचा आभारी आहे. ऑगस्टमध्ये होणाऱ्या स्पर्धेत सर्वाना अभिमान वाटेल, अशी कामगिरी करेन,’’ असे मत सुप्रियने व्यक्त केले.

टेटे : भारताचा सलग दुसरा विजय
वृत्तसंस्था, टोक्यो
टोक्यो, जपान येथे सुरू असलेल्या जागतिक सांघिक टेबल टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत भारताने पुरुष तसेच महिला गटात जेतेपदावर नाव कोरले. पुरुष संघाने ऑस्ट्रेलियाचा ३-० असा धुव्वा उडवला तर महिला संघाने चुरशीच्या लढतीत पोर्तुगालवर ३-१ अशी मात केली. पुढच्या फेरीत पुरुष संघाची इराणशी तर महिला संघाची तुर्कीशी लढत होणार आहे.
पुरुषांमध्ये शरथ कमालने डेव्हिड पॉवेलवर ११-९, ११-७, ७-११, ११-८ असा विजय मिळवला. राष्ट्रीय विजेता सनील शेट्टीने ह्य़ू हेमिंगला ९-११, ११-९, १३-११, ८-११, ११-३ असे नमवले. हरमीत देसाईने केन टाऊनसेंडचा ११-६, ११-७, ११-७ असा पराभव केला. महिलांमध्ये मनिका बात्राने रिता फिन्सवर ७-११, ११-६, ११-५, ११-७ असा विजय मिळवला. मात्र दुसऱ्या लढतीत अना नेव्हसने शामिनी कुमारेसनवर ११-६, ५-११, ११-९, ११-६ अशी मात केली. महाराष्ट्राच्या मधुरिका पाटकरने लेइला ऑलिव्हराचा ११-७, ११-५, ११-८ असा पराभव केला. चौथ्या लढतीत शामिनीने अ‍ॅना इव्हसवर ९-११, ७-११, ११-५, १२-१०, ११-६ असा विजय मिळवला. दर दोन वर्षांनी होणाऱ्या या स्पर्धेत भारताचे दोन्ही संघ दुसऱ्या विभागात खेळत आहेत. २४ संघांपैकी अव्वल दोनच संघ अजिंक्यपद स्पर्धेसाठी पात्र ठरतात.

भारतीय महिला हॉकी संघाचा दुसरा पराभव
ग्लासगो : चॅम्पियन्स चॅलेंज हॉकी-१ स्पर्धेत भारतीय महिला संघाला सलग दुसऱ्या पराभवाला सामोरे जावे लागले. ग्लासगो नॅशनल सेंटर येथे झालेल्या लढतीत स्कॉटलंडच्या संघाने भारताचा ४-० असा धुव्वा उडवला. पहिल्या लढतीत कोरियाने भारतावर ४-२ अशी मात केली होती. भारताचा पुढचा मुकाबला बेल्जियमशी होणार आहे. स्कॉटलंडतर्फे निकी किड, इमिली मॅग्युर, विकी बुन्स आणि बेकी वॉर्ड या चौघींनी प्रत्येकी एक गोल केला.

सोमदेवची आगेकूच
ओअिरस, पोर्तुगाल : पोर्तुगाल खुल्या टेनिस स्पर्धेत सोमदेव देववर्मनने मॅथ्यू इब्डनला नमवत विजयी आगेकूच केली. जागतिक क्रमवारीत १०२व्या स्थानी असलेल्या सोमदेवने क्रमवारीत ६४व्या स्थानी असलेल्या इब्डनवर ६-२, ६-३ असा विजय मिळवला. गेल्या तीन महिन्यांत पाच स्पर्धामध्ये सोमदेवला सलामीच्या लढतीतच पराभवाला सामोरे जावे लागले होते. या स्पर्धेत मात्र त्याने हा इतिहास बाजूला सारत वाटचाल केली. पुढच्या फेरीत त्याच्यासमोर जागतिक क्रमवारीत सहाव्या स्थानी असलेल्या टॉमस बर्डीचचे आव्हान असणार आहे.

भारतीय खेळाडूंची सुरेख कामगिरी
पीटीआय, नवी दिल्ली
भारतीय खेळाडूंनी तीन सुवर्णपदकांसह सात पदकांची कमाई करीत पर्थ येथे सुरू असलेल्या आंतरराष्ट्रीय राष्ट्रकुल जिम्नॅस्टिक्स स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी केली.  
राष्ट्रकुल क्रीडा व आशियाई क्रीडा (२०१०) स्पर्धामध्ये पदके मिळविणाऱ्या आशिषकुमारने पर्थ येथील स्पर्धेत दोन सुवर्णपदके जिंकली. त्याने फ्लोअर एक्झरसाइज व व्हॉल्टमध्ये हे यश संपादन केले. त्याने कलात्मक जिम्नॅस्टिक्स व समांतर बार या प्रकारांमध्ये रौप्यपदक मिळविले.
महिलांमध्ये दीपा कर्माकर हिने व्हॉल्ट या प्रकारात सोनेरी कामगिरी केली तसेच तिने बॅलन्सिंग बीम या प्रकारात रुपेरी यश मिळविले. पुरुषांच्या कलात्मक सांघिक विभागात भारतीय संघास कांस्यपदक मिळाले.

नाशिक, अध्यक्षीय संघ अंतिम फेरीत
क्रीडा प्रतिनिधी, पुणे<br />घनश्याम देशमुख याने केलेल्या शतकामुळेच नाशिक संघाने अ‍ॅम्बिशियस क्लबचा पहिल्या डावातील आघाडीच्या जोरावर पराभव केला आणि वरिष्ठ गटाच्या निमंत्रित क्रिकेट स्पर्धेत अंतिम फेरी गाठली. विजेतेपदासाठी त्यांना अध्यक्षीय संघाच्या आव्हानास सामोरे जावे लागणार आहे. नाशिकविरुद्ध प्रथम फलंदाजी करताना अँम्बिशियस क्लबने पहिल्या डावात २४४ धावा केल्या. त्यामध्ये अपूर्व दराडे याने केलेल्या शैलीदार ७४ धावांचा वाटा होता.
नाशिकने अ‍ॅम्बिशियसला उत्तर देताना पहिल्या डावात ६ बाद ३०३ धावा केल्या. त्यामध्ये देशमुख (१०४), मोहित कपूर (९१) व विराज ठाकूर (६६) यांनी केलेल्या दमदार फलंदाजीचा महत्त्वाचा वाटा होता. अन्य लढतीत अध्यक्षीय संघाने केडन्स क्लबचा पहिल्या डावातील आघाडीमुळेच पराभव केला. अध्यक्षीय संघाने पहिल्या डावात २४८ धावा केल्या. त्यास उत्तर देताना केडन्सचा पहिला डाव १७७ धावांमध्ये आटोपला. त्यांच्या रोहित मोटवानी याने झुंजार खेळ करीत ९४ धावा केल्या मात्र त्यांच्या अन्य फलंदाजांनी निकित धुमाळ (६/४१) याच्या प्रभावी गोलंदाजीपुढे सपशेल शरणागती स्वीकारली. अंतिम लढत १ व २ मे रोजी गहुंजे येथील स्टेडियमवर होणार आहे.