कराड : टोक्यो ऑलिम्पिकमध्ये तिरंदाजी क्रीडा प्रकारात भारताचे प्रतिनिधित्व करणाऱ्या प्रवीण जाधव याच्या कुटुंबीयांना जिवे मारण्याच्या धमक्या दिल्या जात असल्याच्या प्रकाराने एकच खळबळ माजताना लोकांमधून संतापही व्यक्त होत आहे. राज्याचे गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई, क्रीडामंत्री सुनील केदार यांनी लक्ष घालून जाधव कुटुंबावर अन्याय होणार नसल्याची ग्वाही दिली आहे.

सरडे (ता. फलटण) येथे प्रवीण जाधवचे झोपडीवजा घर असून, त्याच्या दुरुस्तीच्या कामावरून शेजाऱ्यांशी असलेल्या वादातून जाधव कुटुंबाला जिवे मारण्याच्या धमक्या येत आहेत. यावर भयभीत झालेले जाधव कुटुंब गाव सोडून जाण्याच्या विचारात असल्याने या प्रकरणात आता विधान परिषदेचे सभापती रामराजे निंबाळकर, राज्याचे गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई, क्रीडामंत्री सुनील केदार यांनी लक्ष घालून जाधव कुटुंबावर अन्याय होणार नसल्याची ग्वाही दिली आहे. मंत्री केदार यांनी दोषींवर कारवाई होणार असल्याचे म्हटले आहे. तर, गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी त्रास देणाऱ्यांना योग्य समज दिली गेली असल्याचे स्पष्ट केले आहे.

याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना सूचना केल्या असून, पोलीस व महसूल प्रशासनाने तेथे हस्तक्षेप करून, उचित कारवाईही केली असल्याचे मंत्री देसाई यांनी सांगितले आहे.