नवी दिल्ली : अध्यक्ष इंदरजित सिंह राव यांची हकालपट्टी करून राष्ट्रीय क्रीडा धोरणाचे उल्लंघन केल्याप्रकरणी भारतीय पॅरालिम्पिक समितीची मान्यता क्रीडा मंत्रालयाने रद्द केली आहे.

प्रशासनामध्ये गैरवर्तन केल्याप्रकरणी भारतीय पॅरालिम्पिक समितीला शिक्षा ठोठावण्यात आली आहे, असे क्रीडा मंत्रालयाने सोमवारी पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे. पॅरालिम्पिक समितीच्या बैठकीत इंदरजित सिंह यांची बहुमताने हकालपट्टी करण्यात आली होती. समितीची ही भूमिका असमाधानकारक असल्याची तक्रार सिंह यांनी क्रीडा मंत्रालयाकडे केली होती. पॅरालिम्पिक समितीने ४ मे रोजी झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेत आपल्या नियमांमध्ये बदल केले होते. केंद्र सरकारचे राज्यमंत्रिपद (नियोजन) सांभाळणाऱ्या सिंह यांनी याबाबत आक्षेप घेतल्यानंतर पुढील घडामोडी घडल्या होत्या.

‘या तक्रारीनंतर पॅरालिम्पिक समितीच्या उपाध्यक्षांनी स्पष्टीकरण दिले होते. मात्र ते असमाधानकारक असल्याने ही कारवाई करण्यात आली. त्याचबरोबर पॅरालिम्पिक समितीची मे महिन्यातील वार्षिक सर्वसाधारण सभा तसेच २५ जानेवारी आणि २५ फेब्रुवारी रोजी झालेली विशेष सर्वसाधारण सभा ही अवैध असल्याने हे पाऊल उचलण्यात आले,’ असे क्रीडा मंत्रालयाने पत्रात म्हटले आहे.