लाल फितीच्या कारभारावर टीकास्त्र सोडत पद्मभूषण पुरस्कारासाठी शिफारशीतून डावलले गेल्याच्या सायना नेहवालच्या भूमिकेनंतर आता क्रीडा मंत्रालयाने पवित्रा बदलला आहे. ट्विटरच्या माध्यमातून प्रशासकीय अनागोंदीवर आसूड ओढणाऱ्या सायनाची दखल घेत क्रीडा मंत्रालयाने सायनाच्या नावाची शिफारस पद्मभूषण पुरस्कारासाठी केली आहे. मात्र त्याच वेळी या पुरस्कारासाठीच्या निर्धारित वेळेत सायनाच्या नावाची शिफारस भारतीय बॅडमिंटन संघटनेकडून दाखल झाली नसल्याचेही क्रीडा मंत्रालयाने स्पष्ट केले आहे.
बॅडमिंटनमधील अतुलनीय योगदानासाठी विशेष बाब म्हणून सायनाचा पद्मभूषण पुरस्कारासाठी विचार व्हावा असे गृह मंत्रालयाला कळवल्याचे केंद्रीय क्रीडामंत्री सर्बानंद सोनावाल यांनी सांगितले. दरम्यान भारतीय बॅडमिंटन संघटनेने या पुरस्कारासाठी आपल्या नावाची शिफारस गेल्या वर्षी ऑगस्टमध्येच केल्याचे सायनाने म्हटले होते. मात्र क्रीडा मंत्रालयाला हे पत्र शनिवारी ३ जानेवारीला म्हणजेच सहा महिन्यांच्या कालावधीनंतर मिळाल्याचे सोनोवाल यांनी सांगितले.
पद्मभूषण पुरस्कार सायनाला मिळावा यासाठी २०१३ आणि २०१४ मध्येही भारतीय बॅडमिंटन संघटनेने कोणताही पत्रव्यवहार केलेला नाही या भूमिकेचा क्रीडा मंत्रालयाने पुनरुच्चार केला. यंदाच्या पद्म पुरस्कारांसाठी निवेदन स्वीकारण्याची अंतिम तारीख १५ सप्टेंबर २०१४ ही होती. त्यानुसार सर्व खेळांच्या केंद्रीय संघटनांना सूचित केल्याचे मंत्रालयाने सांगितले. विविध खेळांनी दिलेल्या शिफारशींचा अभ्यास करून सुशील कुमारची पद्मभूषण पुरस्कारासाठी सुशील कुमारची निवड करण्यात आली. २००८ बीजिंग ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक, २०१० राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक, २०१० वरिष्ठ जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत सुवर्णपदक, २०१२ लंडन ऑलिम्पिक स्पर्धेत रौप्यपदक आणि २०१४ राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्णपदक या प्रदर्शनाच्या बळावर सुशीलची पद्मभूषण पुरस्कारासाठी निवड करण्यात आली.
पुरस्कार मागणारी मी कोण -सायना
पद्मभूषण पुरस्कारासाठी शिफारस न होण्यामागचे कारण काय, एवढेच मी विचारले होते. पुरस्कार मला मिळावा अशी भूमिका कधीही घेतलेली नाही. पुरस्कार मागणारी मी कोण, असा सवाल अव्वल बॅडमिंटनपटू सायना नेहवालने केला आहे. क्रीडा मंत्रालयाच्या भूमिकेचा मी आदर करते. ज्या पद्धतीने प्रसारमाध्यमांनी हे प्रकरण रंगवले ते योग्य नाही. मी खेळाडू आहे, मी देशासाठी खेळते. या पुरस्कारासाठी माझ्या नावाचा विचार का झाला नाही हे जाणून घेण्याचा माझा प्रयत्न होता. सुशील कुमार हा चांगला मित्र आहे. त्याला पुरस्कार मिळाल्याचा आनंदच आहे. आमच्यात वैर होण्याचा प्रश्नच नाही.