लंडन ऑलिम्पिकमधील कांस्यपदक विजेती आणि पाच वेळा विश्वविजेतेपदाचा किताब पटकावणारी एम. सी. मेरी कोम हिच्या इम्फाळमधील बॉक्सिंग अकादमीतील बांधकामासाठी क्रीडा मंत्रालयाकडून अतिरिक्त निधी मंजूर करण्यात आला आहे.
‘‘राष्ट्रीय क्रीडा विकास निधीच्या कार्यकारी समितीने मेरी कोमच्या विभागीय बॉक्सिंग अकादमीमधील आऊटडोअर बॉक्सिंग सभागृह बांधण्याकरिता अतिरिक्त आर्थिक साहाय्य करण्याला तत्वत: मंजुरी दिली आहे. मेरी कोमच्या बॉक्सिंग अकादमीकडून योग्य त्या कागदपत्रांची पूर्तता झाल्यावर या शिफारशीवर कार्यवाही करण्यात येईल,’’ असे क्रीडा मंत्रालयाने जाहीर केलेल्या पत्रकात म्हटले आहे.
‘‘राष्ट्रीय क्रीडा विकास निधीच्या कार्यकारी समितीने अकादमीतील जिम्नॅशियम सभागृह आणि जिमचे साहित्य बसवण्यासाठी ३०६.४४ लाख रुपयांचा निधी मे महिन्यात मंजूर केला होता,’’ असेही त्यात म्हटले आहे.
सरावासाठी ५० क्रीडापटूंना निधी मिळणार
नवी दिल्ली : राष्ट्रीय क्रीडा विकास निधी योजनेअंतर्गत भारताची ऑलिम्पिकमधील कामगिरी सुधारण्यासाठी क्रीडा मंत्रालयाकडून खेळाडूंना सरावासाठी निधी उपलब्ध करून दिला जाणार आहे. त्यासाठी विविध खेळांतील ५० क्रीडापटूंची निवड करण्याचे आदेश क्रीडा मंत्रालयाने भारतीय क्रीडा प्राधिकरणला (साई) दिले आहेत. ‘‘राष्ट्रीय क्रीडा महासंघांशी चर्चा करून ऑगस्ट महिन्याच्या अखेपर्यंत क्रीडापटूंच्या नावाची शिफारस करण्याचे आदेश देण्यात आले आहेत,’’ असे क्रीडा मंत्रालयाकडून सांगण्यात आले.