भारतीय पॅरा-ऑलिम्पिक समितीवर (पीसीआय) बंदी असली तरी भारतीय अपंग खेळाडूंना देशाकडूनच सहभागी होण्यास परवानगी द्यावी, अशी विनंती केंद्रीय क्रीडा मंत्रालयाने आंतरराष्ट्रीय पॅरा-ऑलिम्पिक समितीला (आयपीसी) केली आहे.
खेळाडूंच्या गैरसोयीबद्दल तसेच ढिसाळ कारभारास जबाबदार धरून आयपीसीने पीसीआयवर बंदी घातली आहे. मात्र खेळाडूंचे नुकसान होऊ नये म्हणून आयपीसीने भारतीय खेळाडूंना विविध आंतरराष्ट्रीय स्पर्धामध्ये आयपीसीच्या ध्वजाखाली भाग घेण्यास परवानगी दिली आहे. त्यामुळे विविध स्पर्धामध्ये भाग घेण्याचा खेळाडूंचा मार्ग मोकळा झाला आहे.
मंत्रालयाने आयपीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी झेव्हियर गोन्झालेस यांना लिहिलेल्या पत्रात भारतीय खेळाडूंना भारतीय पथकाकडूनच उतरण्यास परवानगी द्यावी अशी विनंती केली आहे. तसेच क्रीडा माहिती व्यवस्थापन प्रणालीमध्ये समावेश नसलेल्या खेळाडूंनाही भाग घेण्याची संधी द्यावी, असे कळवले आहे.