यंदाच्या फॉम्र्युला वन हंगामात जबरदस्त फॉर्मात असणाऱ्या निको रोसबर्गला आपल्या ताफ्यात ठेवण्यात मर्सिडीझने यश मिळवले आहे. मर्सिडीझ संघाने रोसबर्गशी बहुवर्षांसाठी करारबद्ध केला असून, यामुळे आगामी शर्यतीतही मर्सिडीझचे वर्चस्व राहण्याची शक्यता आहे. २९ वर्षीय रोसबर्ग २०१० मध्ये मर्सिडीझ संघात दाखल झाला. पाच हंगामांमध्ये त्याने सहा शर्यतींच्या जेतेपदावर कब्जा केला. १७ वेळा अव्वल तीनमध्ये स्थान पटकावले आणि आठवेळा पोल पोझिशन मिळवली. रोसबर्गला आणखी वर्षांसाठी करारबद्ध केल्याने मर्सिडीझ परिवाराला आनंद होत आहे असे मर्सिडीझच्या संकेतस्थळावर प्रसिद्धीला देण्यात आलेल्या पत्रकात म्हटले आहे. या करारामुळे मर्सिडीझच्या संघाला स्थैर्य आणि संतुलितता लाभणार असून, मर्सिडीझ बेंझ आणि निको या मायदेशात होणाऱ्या शर्यतीसाठी आमचा संघ बळकट झाला आहे. दरम्यान जगातील सर्वोत्तम संघाचा शर्यतपूट असल्याचा अभिमान आहे अशा शब्दांत रोसबर्गने आपल्या भावना व्यक्त केल्या. यंदाच्या हंगामात रोसबर्ग ड्रायव्हर्स चॅम्पियनशिपमध्ये अवघ्या चार गुणांनी आघाडीवर आहे.  रोसबर्ग मर्सिडीझ संघाकडेच राहणार असल्याचे तो आणि संघसहकारी लुईस हॅमिल्टन यांच्यात जेतेपदाची चुरस आणखीनच तीव्र होणार आहे.

एल्गरचे शतक ; द. आफ्रिका ५ बाद २६८
गॉल : डीन एल्गरच्या शतकी खेळीच्या जोरावर दक्षिण आफ्रिकेने श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या कसोटीच्या पहिल्या दिवशी ५ बाद २६८ अशी मजल मारली. हशीम अमलाच्या नेतृत्त्वाखाली प्रथमच खेळणाऱ्या दक्षिण आफ्रिकेच्या डावाला एल्गरने आधार दिला. त्याने ११ चौकार आणि ३ षटकारांसह १०३ धावांची खेळी केली. फॅफ डू प्लेसिसने ८० धावा करत एल्गरला चांगली साथ दिली. या दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी १२५ धावांची भागीदारी केली. मात्र हशीम अमला, एबी डीव्हिलियर्स आणि क्विंटन डि कॉक झटपट बाद झाल्याने दक्षिण आफ्रिकेचा डाव घसरला. श्रीलंकेतर्फे सुरंगा लकमल आणि दिलरुवान परेरा यांनी प्रत्येकी २ बळी टिपले.

बॉक्सिंगपटूंच्या प्रशिक्षकांना प्रवेश नाकारला
मुंबई : समन्वयाच्या अभावामुळे भारतीय बॉक्सिंगपटूंच्या प्रशिक्षकांना रिंगनजीक प्रवेश नाकारण्यात आल्याचे वास्तव उघड झाले आहे. आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग संघटनेने भारतीय बॉक्सिंग महासंघ बरखास्त केल्याने ही परवानगी नाकारण्यात आल्याचे समजते. यासंदर्भात संयोजकांनी भारतीय ऑलिम्पिक संघटनेला माहिती दिल्याचे सूत्रांनी सांगितले. राष्ट्रकुल क्रीडा संयोजकांना भारतीय बॉक्सिंग संघटना बरखास्त झाल्यानंतर बॉक्सिंगपटूंच्या सोयीसाठी पर्यायी संघटनेची निर्मिती केल्याचे माहिती नसल्याने हा घोळ झाल्याचे सूत्रांनी सांगितले. हा प्रश्न लवकरात लवकर मार्गी लागावा यासाठी बोलणी सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.

ह्य़ूजेसचे शतक, कसोटी अनिर्णीत
ब्रस्बेन : भारत ‘अ’ आणि ऑस्ट्रेलिया ‘अ’ यांच्यातील दुसरी कसोटी अनिर्णीत झाली. भारतीय अ संघाचा पहिला डाव ५०१ धावांत आटोपला. नमन ओझाने ११० तर उमेश यादवने ९० धावांची खेळी साकारली. ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या डावात फिलीप ह्य़ूजेसच्या शतकाच्या जोरावर बिनबाद २०२ अशी मजल मारली. ह्य़ूजेसने १६ चौकार आणि एका षटकारासह १०० धावा केल्या तर अ‍ॅलेक्स डूलनने १३ चौकार आणि एका षटकारासह ९१ धावांची खेळी केली. दुसरी कसोटीही अनिर्णीत झाल्याने दोन कसोटी सामन्यांची मालिका ०-० अशी बरोबरीत सुटली.

स्क्वॉश : यश फाडतेला रौप्यपदक
मुंबई :  भारताचा अव्वल स्क्वॉशपटू यश फाडतेने अ‍ॅमस्टरडॅम, नेदरलँड्स येथे झालेल्या १३ वर्षांखालील गटाच्या डच कनिष्ठ खुल्या स्क्वॉश अजिंक्यपद स्पर्धेत रौप्यपदकावर नाव कोरले. अंतिम लढतीत अव्वल मानांकित इंग्लंडच्या जेरेड कार्टरने यशवर ९-११, ११-६, ११-५, १६-१४ असा विजय मिळवला.

बुद्धिबळ : सुनीलधूत नारायणची आगेकूच
पुणे : बालेवाडी येथील शिवछत्रपती क्रीडा नगरीत सुरू असलेल्या ४४व्या राष्ट्रीय खुल्या १९ वर्षांखालील बुद्धिबळ स्पर्धेत सुनीलधूत ल्युना नारायणनने द्वितीय मानांकित इंटरनॅशनल मास्टर अरविंद चिदंबरमवर मात केली. या विजयासह सुनीलधूत ७.५ गुणांसह आघाडीवर आहे. चिदंबरम, कार्तिकेयन मुरली, फेनील शाह आणि अँटोनिओ व्हिआनी डि कुन्हा हे प्रत्येकी ७ गुणांसह संयुक्तपणे दुसऱ्या स्थानी आहे. मुलींमध्ये जे. शरण्याने वैशालीला नमवत एका गुणाच्या आघाडीसह अव्वल स्थान पटकावले.  

बॅडमिंटन : श्रियंशीची विजयी सलामी
मुंबई : बॉम्बे जिमखाना येथे सुरू असलेल्या तिसऱ्या गौतम ठक्कर स्मृती अखिल भारतीय कनिष्ठ बॅडमिंटन स्पर्धेत १७ वर्षांखालील मुलींच्या गटात अव्वल मानांकित श्रियंशी परदेशीने विजयी सलामी दिली. श्रियंशीने निवेदता रावचा २१-७, २१-६ असा धुव्वा उडवला. दीप्ती रमेशने मयुरी यादववर २१-८, १७-२१, २१-९ असा विजय मिळवला. पल्लवी पितळेने दमन राजकुमारला २१-१४, २१-१५ असे नमवले. अनघा मोघेने कोशा त्रिवेदीवर २१-१७, २१-१० अशी मात केली. शिखा गौतमीने आर्या धांडाचा २१-९, २१-१२ असा पराभव केला. चेरिश डिसुझाने निवेधा श्रीनिवासनवर २१-१३, २१-१२ असा विजय मिळवला.

डय़ुरँड चषक फुटबॉल स्पर्धा
मुंबई : ऐतिहासिक डय़ुरँड चषक फुटबॉल स्पर्धा २८ ऑक्टोबर ते ९ नोव्हेंबर या कालावधीत गोवा येथे होणार आहे. भारतीय लष्कराच्या महाराष्ट्र, गुजरात आणि गोवा येथील मुख्यालयाच्या अंतर्गत ही स्पर्धा खेळवण्यात येणार आहे. १८८८ मध्ये पहिल्यांदा आयोजित ही स्पर्धा जगातील तिसऱ्या क्रमांकाची जुनी स्पर्धा आहे.

एनएससीआय स्क्वॉश स्पर्धा
मुंबई : नॅशनल स्पोर्ट्स क्लब ऑफ इंडियातर्फे (एनएससीआय) कनिष्ठ आणि दुहेरी स्क्वॉश स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. १९ ते २३ जुलै या कालावधीत ही स्पर्धा होणार असून ११, १३, १५ आणि १९ वर्षांखालील गटात ही स्पर्धा होणार आहे.