अ‍ॅथलेटिक्स महासंघाविरुद्धचा दावा न्यायालयाने फेटाळल्याचे पडसाद

न्यूयॉर्क : दक्षिण आफ्रिकेची जगविख्यात धावपटू कॅस्टर सेमेन्याबाबत न्यायालयाने दिलेल्या निर्णयामुळे तिची कारकीर्दच धोक्यात आली आहे. तो निकाल हा अनेक अर्थानी एकमेवाद्वितीय असला तरी त्यामुळे संपूर्ण क्रीडाजगत या प्रश्नावर द्विधा मन:स्थितीत सापडल्याचे दिसते.

सेमेन्या ही लिंगबदल (ट्रान्सजेंडर) केलेली धावपटू नाही. मात्र काही प्रमाणात उभयलिंगी (इंटरसेक्स) असणाऱ्या धावपटूंमध्ये तिची गणना केली जाते. तिच्या या खटल्यामुळे अशा स्वरूपाचे दोष जन्मजात असलेल्या खेळाडूंच्या प्रश्नावर प्रकाशझोत पडला आहे. सेमेन्याच्या शरीरातील टेस्टोस्टेरॉनची पातळी ही अन्य सामान्य महिलांच्या तुलनेत खूप अधिक आहे. त्या पाश्र्वभूमीवर अन्य महिला धावपटूंनी सेमेन्यावर आक्षेप नोंदवला होता. त्यानंतर सेमेन्याने प्रदीर्घ काळ न्यायालयीन लढा लढतानाच ऑलिम्पिक पदकांवरदेखील नाव कोरले होते. परंतु अ‍ॅथलेटिक्स महासंघाच्या नियमाविरोधातील सेमेन्याचे आव्हान न्यायालयाने फेटाळले. महिला धावपटूंनी त्यांच्या शरीरातील टेस्टोस्टेरॉन या संप्रेरकाची पातळी योग्य राखण्याचे आदेश न्यायालयाने दिले. त्यामुळे आंतरराष्ट्रीय अ‍ॅथलेटिक्स महासंघाच्या (आयएएएफ) नियमाविरोधात सेमेन्याने न्यायालयात दिलेले आव्हान फेटाळले गेले आहे. परंतु न्यायालयाने कोणत्याही पूर्वग्रहदूषित भावनेने केलेल्या नियमावलींबाबत चिंतादेखील व्यक्त केली होती.

सेमेन्याने दोन वेळा ऑलिम्पिक विजेतेपद पटकावले आहे. आंतरराष्ट्रीय अ‍ॅथलेटिक्स महासंघाने तयार केलेल्या नवीन नियमानुसार महिला खेळाडू म्हणून तुम्हाला स्पर्धेत सहभागी व्हायचे असेल तर त्या महिलेचे टेस्टोस्टेरॉन संप्रेरक हे विशिष्ट पातळीपर्यंतच असले पाहिजे, असे म्हटले होते. खेळाडूंनी ही पातळी योग्य राखली तरच त्यांना ऑलिम्पिकमध्ये महिला खेळाडू म्हणून सहभागी होता येईल, अशा या नियमाविरोधात सेमेन्याने न्यायालयात धाव घेऊन दाद मागितली होती. हे निर्बंध अन्यायकारक असल्याचे सेमेन्याचे म्हणणे होते. या प्रकरणात तीन न्यायाधीशांच्या खंडपीठाने सेमेन्याच्या याचिकेविरोधात निकाल दिला. सर्व महिलांना न्याय मिळावा, या दृष्टीने घातलेले हे निर्बंध काहीसे पूर्वग्रहदूषित असले तरी आवश्यक असल्याचे न्यायालयाने म्हटले होते.

सेमेन्या या समस्येचा सामना २००९ पासून करीत असून जागतिक अ‍ॅथलेटिक्स महासंघाच्या चुकीच्या धोरणामुळे तिला हा फटका सहन करावा लागणार आहे. त्यामुळे मला सेमेन्यासाठी वाईट वाटते आहे. मलादेखील काही काळ या स्वरूपाचा त्रास सहन करावा लागला होता. सेमेन्या यातून लवकरच सावरेल.

-द्युती चंद, भारतीय धावपटू