नवी दिल्ली : करोनाच्या संकटाचा सामना करताना आपला जीव धोक्यात घालून कार्य बचावणारे आरोग्यसेवेतील कर्मचारी तसेच पोलीस आणि अन्य क्षेत्रातील खऱ्या योद्धय़ांना पेले, दिएगो मॅराडोना तसेच झिनेदिन झिदान या महान फुटबॉलपटूंसह भारताचा माजी कर्णधार बायच्युंग भूतिया याने मानवंदना दिली आहे.

अत्यावश्यक सेवा बजावणाऱ्या सर्व क्षेत्रांतील कर्मचाऱ्यांना मानवंदना देण्यासाठी आंतरराष्ट्रीय फुटबॉल महासंघाने (फिफा) ‘वुई विल विन’ हा व्हिडीयो बनवला असून त्यात भूतिया याच्यासह जगभरातील ५०पेक्षा जास्त आजी-माजी महान फुटबॉलपटूंचा समावेश आहे.

‘‘संपूर्ण जगभरात वैद्यकीय सेवेतील कर्मचारी आपला जीव धोक्यात घालून मानवसेवा बजावत आहेत. दुर्दैवाने त्यापैकी काही जणांना करोनाची बाधा झाली आहे. कायदा-सुव्यवस्था, औषध बनविणारे आणि विक्रेते, काही दुकानदार, गोदामे, डिलिव्हरी सेवा, सार्वजनिक वाहतूक त्याचबरोबर सुरक्षा या सेवांमधील कर्मचाऱ्यांच्या कार्यामुळेच लोकांना सुरक्षितपणे घरात राहून करोनाचा सामना करता येतो आहे. या सर्व कर्मचाऱ्यांना फुटबॉल खेळाच्या वतीने मानवंदना देण्यात आली आहे. फुटबॉल तुमची सेवा नेहमीच लक्षात ठेवेल आणि तुम्हाला मदत करेल,’’ असे या व्हिडीयोत म्हटले आहे.

‘‘आरोग्यसेवेतील तसेच अन्य क्षेत्रातील कर्मचारी हे खऱ्या अर्थाने हिरो आहेत. त्यांच्या कार्याचा सन्मान व्हायलाच हवा. करोनाशी लढा देताना ते आपले काम करत आहेत,’’ असे ‘फिफा’च्या या संदेशात म्हटले आहे. या व्हिडीयोमध्ये डेव्हिड बेकहॅम, गियानलुइगी बफन, फॅबियो कन्नावारो, आयकर कसिल्लास, काका, गेरार्ड पिके, सर्जियो रामोस, रॉबेटरे कालरेस, रोनाल्डो आणि मार्को व्हॅन बास्टन यांसारख्या महान फुटबॉलपटूंनी सहभाग घेतला आहे.