निवडणुकीची आचारसंहिता लागण्यापूर्वी श्रेय लाटून मतदारांना भुलवण्यासाठी राज्य सरकारने गुडघ्याला बाशिंग बाधून शिवछत्रपती पुरस्कार जाहीर करण्याची लगीनघाई केली खरी, पण ती त्यांच्या चांगलीच अंगलट आली आहे. शासननिर्णयातील त्रुटी आणि पुरस्कारासाठी लायक असूनही आपल्याला डावलण्यात आले आहे, असा टाहो काही खेळाडू आणि प्रशिक्षकांनी फोडून गुरुवारी राज्यात एकच रणकंदन माजवले आहे. पुण्यात झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये राज्यातील क्रीडा स्पर्धाच्या आयोजनाची माहिती देत असताना पत्रकारांनी पद्माकर वळवी यांच्यावर प्रश्नांची सरबत्ती केली. पण सुधारण्याची गरज असून रचनेत बदल करण्याची गरज आहे, पण हे सारे लगेचच अंमलात येऊ शकत नसल्याचे वळवी यांनी यावेळी सांगितले.
मुंबईमध्ये जलतरणपटू, प्रशिक्षक आणि प्रशासक यांनी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली होती. त्यानंतर अजित पवारांनी वळवींशी संपर्क साधत कैफियत मांडणाऱ्यांना आश्वासनही दिले. याबाबत वळवी म्हणाले की, ‘‘शासननिर्णयात सुधारणेची गरज आहे, पण ती कधी, कुठे आणि केव्हा याचा विचार करायला हवा. काही खेळाडूंना वगळावे लागणार, हे दुर्दैवी आहे. पण ज्या खेळाडूंवर अन्याय झाला त्यांचा आम्ही पुढच्या वर्षी नक्कीच विचार करू,’’ असे वळवी म्हणाले.
‘‘राज्याबाहेरील प्रशिक्षक, राष्ट्रीय स्पर्धामध्ये न खेळणारे खेळाडू आणि आटय़ापाटय़ासारखे खेळ ज्यांच्या स्पर्धा होत नाही, अशांना पुरस्कार कसे देण्यात आले, असे विचारल्यावर या साऱ्या गोष्टींचा पुन्हा एकदा अभ्यास केला जाईल,’’ असे वळवी यांनी सांगितले. पुरस्कार समितीने शिवछत्रपती पुरस्कारांमधून आटय़ापाटय़ा खेळाला वगळण्याची सूचना केली होती, त्यानंतरही या खेळाला पुरस्कार कसे मिळाले, यावर वळवी निरुत्तर झाले, त्यांच्याकडे या प्रश्नांचे कोणतेच उत्तर नव्हते.
यावेळी वळवी यांनी राज्य ऑलिम्पिक स्पर्धा २१-२८ फेब्रुवारीदरम्यान होणार असल्याची माहिती दिली. त्याचबरोबर अपंग महिला पॉवरलिफ्टर इंदिरा गायकवाडला तातडीची एक लाख रुपयांची मदत वळवी यांनी जाहीर करत तिला शासकीय नोकरीचेही आश्वासन दिले.
अजित पवारांचे खेळाडूंना आश्वासन
मुंबई : शिवछत्रपती पुरस्कारांमध्ये खेळाडू आणि प्रशिक्षकांवर झालेले अन्याय आणि चुकीचे धोरण याबाबत जलतरणपटू, प्रशिक्षक आणि जलतरण संघटनेने गुरुवारी राज्याचे उपमुख्यमंत्री आणि महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्ष अजित पवार यांची भेट घेतली. सर्व व्यथा ऐकून घेतल्यावर पवारांनी राज्याचे सहसंचालक नरेंद्र सोपल आणि क्रीडामंत्री पद्माकर वळवी यांच्याशी संपर्क साधत त्यांच्याशी चर्चा केली.
खेळाडूंवर अन्याय होऊ देणार नाही, असा पवित्रा घेत पवारांनी पुरस्कारांच्या अर्जाची पुन्हा तपासणी करून नियमांतील त्रुटी दूर करण्याचे आश्वासन या वेळी दिले. गुरुवारी सकाळी महाराष्ट्र जलतरण संघटनेचे सचिव किशोर वैद्य, प्रशिक्षक राजू पालकर, जनहित याचिकाकर्ता श्रीनिक जांभळे यांच्यासह जलतरतणपटू कृणाल भोसले, सायली गुढेकर, तेजस पार्सेकर, संतोष पाटील आणि तुषार गित्ये यांनी पवारांची भेट घेतली. क्रीडा मंत्री पद्माकर वळवी यांच्याशी संवाद साधताना गंभीर परिस्थितीचे आकलन करून धोरणातील त्रूटी संघटनेचे पदाधिकारी, समिती सदस्य, मंत्री, राज्य मंत्री यांच्याशी २६ जानेवारीनंतर बैठक बोलावली जाईल.