सध्या आयपीएलचा तेरावा हंगाम सुरू आहे. करोना विषाणूच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर अनेक अडचणींचा सामना करून यावेळी संयुक्त अरब अमिरातीमध्ये आयपीएलच्या सामन्यांचं आयोजन करण्यात आलं आहे. असं असलं तरी या सामन्यांना उत्तम प्रतिसादही मिळत आहे. एकीकडे आयपीएल आहे तसंच पाकिस्तानमध्ये पाकिस्तान सुपर लीगचंही आयोजन करण्यात येतं. दरम्यान, भारतीय क्रिकेटपटूंना पाकिस्तान सुपर लीगमध्ये खेळताना पाहायला आवडेल, असं मत पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू वसीम अक्रम यानं व्यक्त केलं. एएनआयला दिलेल्या विशेष मुलाखतीत त्यानं यावर भाष्य केलं.

“माझा नेहमीच असा विश्वास आहे की खेळ हा राजकारणाचा बळी ठरू नये. परंतु हा दोन्ही देशांचा विषय आहे आणि मी काहीही बोलू इच्छित नाही. पण तुम्ही म्हटल्याप्रमाणे आयपीएल ही जगातील सर्वात मोठ्या देशांतर्गत क्रिकेट लीगपैकी एक आहे. पाकिस्तानमधील युवा खेळाडू या स्पर्धेचा भाग बनावेत आणि भारतीय खेळाडू पाकिस्तान सुपर लीगचा भाग बनावेत. त्यांना या स्पर्धेत खेळताना पाहायला आवडेल,” असं वसीम अक्रमनं बोलताना सांगितलं. यावेळी त्यानं भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली आणि पाकिस्तानी संघाचा कर्णधार बाबर आझम यांच्यातील होणाऱ्या तुलनांबाबतही भाष्य केलं.

“मला कोणत्याही प्रकारची तुलना करायची नाही. परंतु बाबर आझममध्ये कौशल्य आहेत. त्यानं क्रिकेटच्या सर्व प्रकारांमध्ये स्वत:चं कौशल्य दाखवलं आहे. जर त्यानं ही तुलना सकारात्मकरित्या स्वीकारली तर मला आवडेल आणि कोहलीप्रमाणे त्यानं सतत आपल्या खेळात प्रगतीही करावी,” असं त्यानं स्पष्ट केलं.

दरम्यान, पहिल्या हंगामात आयपीएलमध्ये पाकिस्तानी खेळाडूंचा समावेश होता. परंतु त्यानंतर कोणत्याही हंगामात पाकिस्तानी खेळाडूंचा आयपीएलमध्ये समावेश करण्यात आला नव्हता. दरम्यान, पाकिस्तानी खेळाडूंनाही आयपीएलमध्ये संधी देण्यात यावी, असं वसीम अक्रम म्हणाला. तसंच आयपीएलमध्ये संधी मिळत नसल्यानं पाकिस्तानी खेळाडूंना नुकसान होत असल्याची कबुलीही त्यानं दिली. २००८ मध्ये मुंबईत झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशातील संबंध कमालीचे ताणले गेले होते. त्यानंतर पाकिस्तानच्या खेळाडूंना आयपीएलमध्ये खेळण्याची परवानगी नाकारण्यात आली होती.