अर्जेंटिनाचे माजी प्रसिद्ध फुटबॉलपटू दिएगो मॅरेडोना यांचं वयाच्या ६० व्या वर्षी निधन झालं. राहत्या घरी हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांची प्राणज्योत मालवली. आपल्या जादुई खेळामुळे आंतरराष्ट्रीय फुटबॉलमध्ये स्वतःचा दबदबा निर्माण करणाऱ्या आणि अर्जेंटिनाला विश्वचषक मिळवून देणाऱ्या मॅरेडोना यांच्या निधनानंतर क्रीडा आणि अन्य क्षेत्रातील नामांकीत व्यक्तींनी हळहळ व्यक्त केली आहे.

काही दिवसांपूर्वीच मॅरेडोना यांच्यावर शस्त्रक्रीया करण्यात आली होती. एका अपघातानंतर मॅरेडोना यांच्या मेंदूत रक्तस्त्राव झाला होता…ज्यानंतर त्यांच्यावर यशस्वी शस्त्रक्रीयाही झाली. यामधून सावरल्यानंतर मॅरेडोना यांना त्यांच्या मुलीच्या घरात हलवण्यात आलं होतं. ३० ऑक्टोबर रोजी मॅरेडोना यांनी आपला ६० वा वाढदिवस साजरा केला. यानंतर अवघ्या काही दिवसांनी मॅरेडोना यांनी अखेरचा श्वास घेतला.