News Flash

डागाळलेला चंद्र

२००८ मध्ये सुरू झालेल्या इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) ट्वेन्टी-२० क्रिकेट स्पध्रेने प्रारंभीच्या काही वर्षांत ऐतिहासिक उंची गाठली, परंतु आता हा आलेख अधोगतीला चालला आहे.

| July 19, 2015 03:09 am

२००८ मध्ये सुरू झालेल्या इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) ट्वेन्टी-२० क्रिकेट स्पध्रेने प्रारंभीच्या काही वर्षांत ऐतिहासिक उंची गाठली, परंतु आता हा आलेख अधोगतीला चालला आहे. क्रिकेटचे अर्थकारण बदलून टाकणाऱ्या आयपीएलच्या नीतिमत्तेने त्यांचा घात केला आणि नियतीने आपला डाव बरोब्बर साधला. आठ वर्षांच्या कालखंडात वादविवाद, स्पॉट-फिक्सिंग, सट्टेबाजी आदी अनेक गोष्टींमुळे आयपीएल कलंकित झाली आहे. त्याची रया हरवली आहे. फक्त सहा संघ आणि अविश्वासाचे वातावरण शिल्लक असताना आयपीएलच्या पुनरुज्जीवनासाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) मात्र उमेदीने पुन्हा जुळवाजुळव करीत आहे.
न्यायमूर्ती आर. एम. लोढा यांच्या समितीने दिलेल्या ताज्या निर्णयाने आयपीएलची उरलीसुरली इभ्रतसुद्धा वेशीवर टांगली आहे. बीसीसीआयचे माजी अध्यक्ष एन. श्रीनिवासन यांचा जावई गुरुनाथ मयप्पन आणि अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्रा यांच्यावर आजीवन बंदी घालण्यात आली आहे. तर राजस्थान रॉयल्स आणि चेन्नई सुपर किंग्ज या संघांनासुद्धा दोन वर्षांसाठी आयपीएलमधून हद्दपार करण्यात आले आहे. या कारवाईनंतर मयप्पन आणि कुंद्रा यांच्या पापाची शिक्षा संघांना का भोगावी लागत आहे. या संघांमधील प्रामाणिकपणे खेळणाऱ्या खेळाडूंचे काय चुकले? त्या खेळाडूंना या दोन वर्षांसाठी आयपीएलमध्ये खेळता येणार नसल्यास लीगमधील रंजकता उरेल का? जसे ऑलिम्पिकमध्ये आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक असोसिएशनची मान्यता नसलेल्या राष्ट्रांना ऑलिम्पिक ध्वजासह उतरण्याची मुभा असते. तशा प्रकारे या खेळाडूंना आयपीएलमध्ये उतरता येईल का? असे अनेक प्रश्न उपस्थित झाले. रविवारी आयपीएल प्रशासकीय समितीची बैठक होणार आहे. यात संघ, खेळाडू आणि डागाळलेल्या आयपीएलची प्रतिमा सुधारण्यासाठी नवे मार्ग शोधले जातील, अशी अपेक्षा आहे.
२०१३ च्या स्पॉट-फिक्सिंगप्रकरणी काही खेळाडू तुरुंगवास भोगत आहेत. आता मयप्पन आणि कुंद्रा यांच्यावर कोणती पुढील कारवाई होते, ते पाहणे उत्सुकतेचे ठरेल. कारण या दोघांवर सध्या असलेली आजीवन बंदी ही फक्त त्यांना क्रिकेटपासून दूर ठेवील, बाकीच्या खेळांपासून नाही. डब्ल्यूडब्ल्यूएफशी साधम्र्य साधणारी कुंद्रा यांची एक ‘फाइट लीग’सुद्धा आहे. त्यामुळे ही कारवाई कितपत परिणामकारक ठरेल, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. श्रीनिवासन यांना जावयाची कृत्ये, हितसंबंधांचे आरोप यामुळे बीसीसीआयचे अध्यक्षपद सोडावे लागले. परंतु मयप्पन आणि कुंद्रा यांच्यामुळे त्यांच्या संपूर्ण संघांना शिक्षा होऊ शकते, तर श्रीनिवासन हे मात्र सहीसलामत कसे काय सुटू शकतात? हा प्रश्न सर्वसामान्य क्रिकेटरसिकांना पडणे स्वाभाविक आहे.
एप्रिल-मे महिन्यात भारतात क्रिकेटसाठी सुगीचे दिवस येतात, तर अन्य क्षेत्रांसाठी हाच काळ पानझडीचा असतो, अशी आयपीएलच्या सुरुवातीच्या काळात आख्यायिका होती. या दोन महिन्यांत सासू-सुनांच्या मालिकांकडे लोक पाठ फिरवायचे. रिअ‍ॅलिटी शोंचा टीआरपी खाली घसरायचा. मोठय़ा बॅनर्सचे चित्रपट प्रदर्शित व्हायचे नाहीत. रस्ते, लोकल यामध्येही हाच प्रभाव जाणवायचा. या संकल्पनेचे जनक ‘व्यवस्थापन गुरू’ ललित मोदी यांना २००८ मध्ये लोकांनी डोक्यावर घेतले. क्रिकेट, मनोरंजन आणि अर्थकारण या त्रिसूत्रीच्या बळावर मोदीने बीसीसीआयला आणि खेळाडूंना श्रीमंत केले. पण अखेर ‘अति तिथे माती’ झाली. आयपीएलची जादू आता ओसरायला लागली. बीसीसीआयच्या अंतर्गत राजकारणाचे अनेक पैलू वादग्रस्त आयपीएलच्या बाबतीतसुद्धा प्रत्ययाला आले. आयपीएलच्या यशाने हरखून गेलेल्या मंडळींनी मग चॅम्पियन्स लीग ट्वेन्टी-२० क्रिकेट स्पध्रेचा घाट घातला. परंतु ही स्पर्धा रुजण्यात अपयशी ठरल्यामुळे बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
आठ वर्षांनंतर आयपीएलचेसुद्धा नावीन्य ओसरले आहे. प्रारंभीच्या वर्षांत दिसणारे गारूड आता कुठेच जाणवत नाही. त्यामुळे प्रशासकीय समितीला आयपीएल टिकवण्यासाठी गांभीर्याने विचार करावा लागणार आहे. दुसरीकडे आणखी एक फ्रेंचायझीवर आधारित लीगच्या चर्चा ऐरणीवर आहेत. जगभरातील दिग्गज खेळाडूंसह ही मोट बांधली जात आहे. परंतु सध्या तरी बीसीसीआयचे आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेवर नेतृत्व आहे. ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यासह भारत जागतिक क्रिकेटच्या तिजोऱ्यांच्या चाव्या सांभाळत असल्याने अशा प्रकारच्या लीगला कितपत प्रतिसाद मिळेल, याबद्दल साशंकता आहे.
आयपीएलला आपण क्रिकेटच्या नभांगणातील चंद्राची उपमा दिल्यास सध्या तरी त्याच्या आकर्षक, तेजोमय रूपापेक्षा डागच प्रकर्षांने दिसू लागले आहेत. आयपीएल बंद करा, अशी मागणी करणारे प्रवाहसुद्धा इथे आहेत. त्यामुळे तूर्तास तरी क्रिकेटचे शुद्धीकरण करत आयपीएलचे भवितव्य बीसीसीआय कसे सावरते, हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल.

prashant.keni@expressindia.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 19, 2015 3:09 am

Web Title: spot on ipl
टॅग : Corruption,Ipl
Next Stories
1 ऑस्ट्रेलियाची मजबूत पकड
2 मोहीम ‘अजिंक्य’ राहणे!
3 श्रीनिवासन हेच गैरव्यवहारांचे जनक – मनोहर
Just Now!
X