गेल्या महिन्यात टेक्सास खुल्या स्क्वॉश स्पध्रेत दिमाखदार कामगिरी बजावणाऱ्या भारताच्या दीपिका पल्लिकलने जागतिक स्क्वॉश क्रमवारील अव्वल दहा स्थानांमध्ये मजल मारली आहे. महिला स्क्वॉश असोसिएशनने प्रकाशित केलेल्या ताज्या क्रमवारीत पल्लिकलने दोन स्थानांनी आगेकूच करीत दहाव्या स्थानावर झेप घेतली आहे. डिसेंबर २०१२नंतर प्रथमच हे यश तिला मिळवता आले आहे.
‘‘क्रमवारीत जेव्हा तुम्ही आगेकूच करता, तेव्हा आनंद होणे स्वाभाविक आहे. अशाच प्रकारे सातत्यपूर्ण कामगिरी करीत अव्वल पाच स्थानांमध्ये स्थान मिळवणे आणि त्यानंतर अग्रस्थान काबीज करण्याचे लक्ष्य मी जोपासले आहे,’’ असे पल्लिकलने यावेळी सांगितले.
गेल्या महिन्यात रिचमंड खुली स्पर्धा जिंकण्याची किमया साधूनही भारताची अन्य महिला स्क्वॉशपटू जोश्ना चिनप्पाच्या क्रमांकामध्ये कोणताही बदल झालेला नाही. ती २१व्या स्थानावरच कायम आहे. तथापि, मलेशियाच्या निकोल डेव्हिडने सलग ९४व्या महिन्यात जागतिक क्रमवारीतील अग्रस्थान टिकवून ठेवले आहे.