भारतीय स्क्वॉश रॅकेट्स महासंघाच्या (एसआरएफआय) पदाधिकाऱ्यांच्या भोंगळ कारभाराचा फटका स्क्वॉश खेळाडूंना बसला आहे. त्यामुळे स्क्वॉशपटूंना १५ ते २१ डिसेंबरदरम्यान वॉशिंग्टन येथे होणाऱ्या जागतिक अजिंक्यपद स्क्वॉश स्पर्धेला मुकावे लागणार आहे.

एसआरएफआयच्या पदाधिकाऱ्यांनी भारतीय क्रीडा प्राधिकरणाकडून (साइ) या स्पर्र्धेसाठी लागणाऱ्या परवानग्या घेतल्या नसल्यामुळे ही नामुष्की ओढवली आहे. ‘‘एसआरएफआयने ‘साइ’कडून आवश्यक परवागन्या घेतल्या नाहीत. त्यामुळे त्यांना आपल्या संघाची नोंदणी करता आली नाही. खेळाडूंना याचा फटका बसणार, हे दुर्दैवी आहे,’’ असे एका पदाधिकाऱ्याने सांगितले. मात्र आपण ‘साइ’कडून परवानग्या घेण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले होते, असे सांगत महासंघाने हे आरोप फेटाळून लावले आहेत.

‘‘नोंदणी करण्याची अंतिम मुदत १६ जुलै होती. आम्ही एक महिन्याआधीच ‘साइ’कडे याविषयी पत्रव्यवहार केला होता. महासंघाने आपल्या वर्षभराच्या स्पर्धाचे वेळापत्रक ‘साइ’कडे सुपूर्द केले आहे. साइ आणि आमच्यातील बैठक ३० जुलै रोजी होणार आहे, मात्र त्याआधीच जागतिक स्पर्धेच्या नोंदणीची तारीख निघून गेली आहे,’’ असे महासंघाच्या एका पदाधिकाऱ्याने सांगितले.

इजिप्तच्या अचरफ करारगुइ यांनी भारताच्या प्रशिक्षकपदाचा राजीनामा दिल्यानंतर पुरुष आणि महिला स्क्वॉशपटूंना प्रशिक्षकाअभावीच खेळावे लागत आहे. त्यामुळे भारतीय स्क्वॉश महासंघ अव्यावसायिक असल्याची टीका खेळाडूंकडून होत आहे. भारतीय पुरुष संघ विजेतेपदाचा दावेदार नसला तरी सौरव घोषाल, महेश माणगांवकर, रमित टंडन यांसारख्या खेळाडूंचे जागतिक स्पर्धेत खेळण्याचे स्वप्न भंगले आहे.