IPL स्पर्धेदरम्यान स्पॉट फिक्सिंग प्रकरणी दोषी आढळलेला क्रिकेटपटू एस श्रीसंतला BCCI कडून दिलासा मिळाल्यानंतर आता तब्बल सात वर्षानंतर तो क्रिकेटच्या मैदानावर परतण्यास सज्ज झाला आहे. सर्वोच्च न्यायालयाने श्रीसंतची बाजू ऐकून घेऊन त्यावर ३ महिन्याच्या आत पुनर्विचार करण्याचे आदेश BCCI ला १५ मार्च २०१९ रोजी दिले होते. त्यानंतर लोकपाल डी. के. जैन हे श्रीसंतबद्दल निर्णय घेतील असा निर्णय BCCI ने घेतला होता. त्यानुसार २० ऑगस्ट २०१९ ला श्रीसंतवरील आजीवन बंदी हटवण्यात आली असून २०२० मध्ये त्याला क्रिकेटच्या मैदानावर परतता येणार असल्याचे सांगण्यात आले होते. त्यानुसार केरळच्या रणजी संघात ३७ वर्षीय श्रीसंतला समाविष्ट करून घेण्याचा निर्णय राज्य क्रिकेट संघटनेने घेतला आहे. यासोबतच श्रीसंत IPL खेळण्याबद्दलही सकारात्मक आहे. IPL च्या पुढच्या वर्षीच्या हंगामासाठी मी नक्की माझं नाव देईन असं श्रीसंतने सांगितलं. तसंच, IPL मध्ये कोणत्या संघाकडून खेळायला आवडेल तेदेखील त्याने सांगितलं.

“मी IPL 2021च्या हंगामासाठी तयार करण्यात येणाऱ्या खेळाडूंच्या ड्रॉ मध्ये नक्कीच माझं नाव टाकेन. मला कोणत्याही संघाने खरेदी केलं तरी मी त्या संघाकडून खेळायला तयार आहे. पण क्रिकेटचा चाहता म्हणून विचाराल तर मला मुंबई इंडियन्स संघाकडून खेळायला आवडेल. त्याचं कारण आहे सचिन तेंडुलकर. मी मुळात क्रिकेट खेळायला सुरुवात केली, त्याचं कारण मला सचिनला भेटायचं होतं. त्यांच्याकडून ड्रेसिंग रूममध्ये देखील खूप काही शिकण्यासारखं आहे. त्यामुळे मला संधी मिळाली तर मी मुंबई इंडियन्सचं नाव घेईन. त्याशिवाय मला धोनीच्या नेतृत्वाखाली किंवा बंगळुरू संघातूनही खेळायला आवडेल”, असे तो म्हणाला.

श्रीसंतने आतापर्यंत आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत २७ कसोटी सामन्यात ८७ बळी टिपले आहेत. ५३ एकदिवसीय सामन्यात ७५ फलंदाजांना माघारी धाडलं आहे, तर १० टी-२० सामन्यात ७ गडी बाद केले आहेत. टी-२० विश्वचषक २००७ मध्ये भारतासाठी विजयी झेलही त्यानेच पकडला होता.