नवी दिल्ली : भारताचा वेगवान गोलंदाज एस. श्रीशांतवरील निकालनिश्चितीप्रकरणी लादण्यात आलेली बंदी रविवारी संपुष्टात आली. श्रीशांतवर आधी आजीवन बंदीची कारवाई केली होती; परंतु न्यायालयाने त्याला दिलासा देत ही शिक्षा सात वर्षांपर्यंत मर्यादित केली होती.

बंदीची शिक्षा संपल्यावर किमान स्थानिक क्रिकेटमध्ये पुनरागमन करण्यासाठी उत्सुक असल्याचे ३७ वर्षीय श्रीशांतने स्पष्ट केले होते. तंदुरुस्ती सिद्ध केल्यास संघात स्थान दिले जाईल, असे आश्वासन त्याच्या केरळ संघाने दिले आहे.

‘‘मी आता माझ्या आवडत्या खेळात खेळण्यासाठी पूर्णत: मोकळा आहे,’’ असे श्रीशांतने म्हटले आहे. ‘आयपीएल’मधील निकालनिश्चिती प्रकरणी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) श्रीशांतसह राजस्थान रॉयल्सचे त्याचे सहकारी अजित चंडिला आणि अंकित चव्हाण यांच्यावर बंदीची कारवाई केली होती.