सनरायझर्स हैदराबादचा वेगवान गोलंदाज टी. नटराजन दुखापतीमुळे इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल)च्या 14 व्या मोसमातील उर्वरित सामन्यांमधून बाहेर पडला आहे. एका अहवालानुसार नटराजन या स्पर्धेत आणखी खेळू शकणार नाही. हैदराबाद संघाने अद्याप याची पुष्टी केलेली नाही. पंजाब किंग्जला मात देत हैदराबादने आयपीएलमधील पहिला विजय नोंदवला आहे.

30 वर्षीय नटराजनने ऑस्ट्रेलिया दौर्‍यावर सर्वच स्वरूपात भारताकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. हैदराबादचा कर्णधार डेव्हिड वॉर्नरने गुरुवारी सांगितले, की या बायो बबलमधील परिस्थिती आणि त्याच्या गुडघ्याच्या दुखापतीकडे पाहिले तर त्याला सात दिवस बाहेर बसावे लागेल.

नटराजनने आयपीएल दरम्यान पहिले दोन सामने खेळले होते, पण त्यानंतरच्या दोन सामन्यात त्याला संधी मिळाली नाही. त्याच्या जागी डावखुरा वेगवान गोलंदाज खलील अहमदने संघात स्थान मिळवले होते.

तीन पराभवानंतर हैदराबादचा विजय

चेन्नईच्या चेपॉक मैदानावर सनरायझर्स हैदराबादने विजयाची चव चाखली. पराभवाची हॅट्ट्रिक साधल्यानंतर हैदराबादने आयपीएलच्या 14व्या सामन्यात पंजाबला 9 गड्यांनी मात दिली. नाणेफेक जिंकून पंजाबचा कर्णधार केएल राहुलने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला, मात्र तो त्याच्या अंगउलट आला. खलील अहमद, अभिषेक शर्मा यांनी हैदराबादकडून प्रभावी गोलंदाजी करत पंजाबला 120 धावांत सर्वबाद केले. प्रत्युत्तरात हैदराबादने एक गडी गमावत हे आव्हान पूर्ण केले. हैदराबादचा सलामीवर जॉनी बेअरस्टोने 63 धावांची नाबाद खेळी करत संघाला विजय मिळवून दिला. त्यालाच सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले.