गॉल : डावखुरा फिरकी गोलंदाज अजाझ पटेलच्या पाच बळींमुळे पहिल्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवशी न्यूझीलंडने श्रीलंकेला मोठी आघाडी घेऊ दिली नाही.

न्यूझीलंडचा पहिला डाव सकाळी २४९ धावांत संपुष्टात आला. त्याला प्रत्युत्तर देताना श्रीलंकेने ७ बाद २२७ धावा केल्या. त्यामुळे श्रीलंकेचा संघ अद्याप २२ धावांनी पिछाडीवर आहे.

न्यूझीलंडने ५ बाद २०३ धावसंख्येवरून पहिल्या डावाला पुढे प्रारंभ केला. परंतु फक्त ४६ धावांची भर घालून त्यांचा उर्वरित निम्मा संघ तंबूत परतला. शतकाकडे कूच करणारा रॉस टेलर ८६ धावांवर बाद झाला. अकिला धनंजयने ८० धावांत ५ बळी घेतले, तर सुरंग लकमलने चार बळी घेत त्याला छान साथ दिली.

मग श्रीलंकेने २ बाद १४३ अशी दमदार सुरुवात केली. परंतु अजाझच्या फिरकीपुढे लंकेच्या फलंदाजांनी शरणागती पत्करली आणि दिवसअखेर २२७ धावांवर त्यांचे ७ फलंदाज तंबूत परतले होते. श्रीलंकेकडून कुशल मेंडिस (५३) आणि अँजेलो मॅथ्यूज (५०) यांनी अर्धशतके झळकावली.

संक्षिप्त धावफलक

न्यूझीलंड (पहिला डाव) : ८३.२ षटकांत सर्व बाद २४९ (रॉस टेलर ८६, हेन्री निकोल्स ४२; अकिला धनंजय ५/८०, सुरंगा लकमल ४/२९)

श्रीलंका (पहिला डाव) : ८० षटकांत ७ बाद २२७ (कुशल मेंडिस ५३, मॅथ्यूज ५०; अजाझ पटेल ५/७६)