News Flash

World Cup 2019 : अफगाणिस्तानच्या स्वप्नांना प्रदीपचा सुरुंग!

श्रीलंकेने डकवर्थ-लुईस नियमाच्या आधारे अफगाणिस्तानवर ३४  धावांनी विजय मिळवला.

वेगवान गोलंदाज नुवान प्रदीपच्या भेदक स्विंग गोलंदाजीने मंगळवारी विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत अफगाणिस्तानच्या फलंदाजांची भंबेरी उडवली. त्यामुळे श्रीलंकेने डकवर्थ-लुईस नियमाच्या आधारे अफगाणिस्तानवर ३४  धावांनी विजय मिळवला.

तत्पूर्वी, प्रथम फलंदाजी करताना सलामीवीर कुशल परेरा आणि कर्णधार दिमुथ करुणारत्ने यांनी श्रीलंकेला शानदार सुरुवात करून दिली. परेराने ४२ चेंडूंत अर्धशतक झळकावले. या दोघांनी १३ षटकांत ९२ धावांची सलामी दिली, मात्र नबीने करुणारत्नेला ३० धावांवर बाद करून ही जोडी फोडली. त्यानंतर डावाच्या २२व्या षटकात नबीने कमाल करत चक्क तीन फलंदाजांना माघारी पाठवले. सर्वप्रथम त्याने लहिरु थिरिमानेचा (२५) त्रिफळा उडवला. त्याच षटकातील चौथ्या चेंडूवर त्याने कुशल मेंडिसला स्लीपमध्ये (२) उभ्या असलेल्या रेहमत शाहकडे झेल देण्यास भाग पाडले, तर सहाव्या म्हणजेच अखेरच्या चेंडूवर अँजेलो मॅथ्यूजलासुद्धा शून्यावरच रेहमतकरवी झेलबाद करून श्रीलंकेची १ बाद १४४ धावांवरून ४ बाद १४६ धावा अशी बिकट अवस्था केली.

त्यानंतर रशीद खानने ३३व्या षटकात परेराचा बळी मिळवत श्रीलंकेच्या चिंता आणखी वाढवल्या. आठ चौकारांसह ७८ धावा करणारा परेरा बाद झाल्यामुळे श्रीलंकेचा संघ अडचणीत सापडला, परंतु त्यानंतर पावसाच्या आगमनामुळे पंचांनी खेळ थांबवण्याचा निर्णय घेतला. पाऊस थांबल्यानंतर पुन्हा खेळाला सुरुवात झाली तेव्हा दौलत व रशीदने झटपट उर्वरित बळी मिळवून लंकेचा डाव ३६.५ षटकांत २०१ धावांत गुंडाळला.

डकवर्थ-लुइस नियमानुसार अफगाणिस्तानपुढे ४१ षटकांत १८७ धावांचे सुधारित लक्ष्य ठेवण्यात आले. अफगाणिस्तानचे सलामीवीर अहमद शहझाद (७) आणि हजरतुल्ला झझाई (३०) यांनी अवघ्या चार षटकांत ३४ धावा फटकावल्या. परंतु अनुभवी लसिथ मलिंगाने ही जोडी फोडली.

नवव्या षटकात प्रदीपचे गोलंदाजीसाठी आगमन झाले आणि त्याच्या स्विंग माऱ्यापुढे अफगाणिस्तानच्या फलंदाजांनी शरणागती पत्करली. झझाई, हश्मतुल्ला शाहिदी (४), गुलाबदीन नैब (२३) आणि रशीद खान (२) यांचे बळी मिळवत त्याने सामना श्रीलंकेच्या बाजूने फिरवला.

संक्षिप्त धावफलक

श्रीलंका : ३६.५ षटकांत सर्वबाद २०१ (कुशल परेरा ७८, दिमुथ करुणारत्ने ३०; मोहम्मद नबी ४/३०, रशीद खान २/१७) विजयी वि. अफगाणिस्तान : ३२.४ षटकांत सर्व बाद १५२ (नजीबुल्ला झादरान ४३, हझरतुल्ला झाझाई ३०, गुलाबदीन नैब २३; नुवान प्रदीप ४/३१, लसिथ मलिंगा ३/३९).

श्रीलंकेतर्फे एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वात जलद ३,००० धावांचा टप्पा गाठणारा लहिरू थिरिमाने (१०० डाव) हा तिसरा फलंदाज ठरला. तिलकरत्ने दिलशान (९२) आणि माव्‍‌र्हन अटापटू (९४) त्याच्यापुढे आहेत.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 4, 2019 8:58 pm

Web Title: sri lanka beat afghanistan register first points
Next Stories
1 World Cup 2019 : टीम इंडियाचे नेतृत्व करत असल्याचा मला अभिमान!
2 World Cup 2019 : “कोणत्याही संघाला कमी लेखण्याची चूक करणार नाही”
3 World Cup 2019 : ‘स्टेन’गन धडाडण्याआधीच थंडावली; शेवटचा विश्वचषक खेळण्याची संधीही हुकली
Just Now!
X