दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पराभवाची मालिका खंडित

श्रीलंका-द. आफ्रिका एकदिवसीय मालिका

पल्लीकेल : पावसाचा फटका बसलेल्या पल्लीकेल येथील एकदिवसीय सामन्यात श्रीलंकेने दक्षिण आफ्रिकेवर तीन धावांनी रोमहर्षक विजय मिळवला आणि मालिकेतील पराभवाची मालिका खंडित केली.

श्रीलंकेने प्रथम फलंदाजी करताना ३९ षटकांत ७ बाद ३०६ धावा उभारल्या. यात दसून शनाकाने ६५ धावांचे महत्त्वाचे योगदान दिले. थिसारा परेराने (५१) त्याला छान साथ दिली. मात्र पावसामुळे डकवर्थ-लुइस नियमाचा अवलंब करीत दक्षिण आफ्रिकेपुढे विजयासाठी २१ षटकांत १९१ धावांचे लक्ष्य ठेवण्यात आले. हशिम अमला (४०) आणि जीन-पॉल डय़ुमिनी बाद झाल्यानंतर दक्षिण आफ्रिकेचे महत्त्वाचे फलंदाज लवकर तंबूत परतले. अखेरच्या षटकात आफ्रिकेला विजयासाठी ८ धावांची आवश्यकता होती. त्यावेळी सुरंगा लकमलने पहिल्या चेंडूवर डेव्हिड मिलरचा त्रिफळा उडवला. मग ज्युनियर डाला आणि लुंगी एन्गिडी यांना विजयाचे लक्ष्य पेलण्यात अपयश आले. लकमलने ४६ धावांत ३ बळी घेतले.

श्रीलंकेच्या संघाने सलग ११ एकदिवसीय सामन्यांत दक्षिण आफ्रिकेकडून हार पत्करली होती. ही पराभवाची मालिका श्रीलंकेने खंडित केली. २०१४मध्ये पल्लीकेल येथेच श्रीलंकेने अखेरचा विजय मिळवला होता.