श्रीलंका-दक्षिण आफ्रिका ट्वेन्टी-२० सामना

कोलंबो : धनंजय डी’सिल्व्हाच्या अष्टपैलू खेळाच्या बळावर श्रीलंकेने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या एकमेव ट्वेन्टी-२० क्रिकेट सामन्यात तीन विकेट राखून शानदार विजय मिळवला.

प्रथम फलंदाजी करणारा दक्षिण आफ्रिकेचा संघ १६.४ षटकांत ९८ धावांत गारद झाला. क्विंटन डी’कॉकने सर्वाधिक २० धावा केल्या. त्यांच्या चार फलंदाजांना भोपळाही फोडता आली नाही. लक्षण संदाकनने १९ धावांत ३ बळी घेतले. डी’सिल्व्हा आणि अकिला धनंजया यांनी प्रत्येकी दोन बळी घेतले.

त्यानंतर श्रीलंकेने १६ षटकांत ७ फलंदाजांच्या मोबदल्यात हे आव्हान पार केले. दिनेश चंडिमलने नाबाद ३६ धावांचे योगदान दिले. त्याला डी’सिल्व्हाने ४ चौकार आणि २ षटकारांसह ३१ धावा काढून छान साथ दिली. २ बाद ६ अशा दयनीय स्थितीनंतर चंडिमल आणि डी’सिल्व्हा यांनी तिसऱ्या विकेटसाठी ५३ धावांची भागीदारी रचली. मग दसून शनाकाने १६ धावा केल्या.

संक्षिप्त धावफलक

दक्षिण आफ्रिका : १६.४ षटकांत सर्व बाद  ९८ (क्विंटन डी’कॉक २०; लक्षण संदाकन ३/१९, धनंजय डी’सिल्व्हा २/२२) पराभूत वि. श्रीलंका : १६ षटकांत ७ बाद ९९ (चंडिमल नाबाद ३६, धनंजय डी’सिल्व्हा ३१; ज्युनिअर डाला २/२२)

सामनावीर : धनंजय डी’सिल्व्हा.