श्रीलंका क्रिकेट संघाचे सध्याचे गोलंदाजी प्रशिक्षक आणि माजी जलदगती गोलंदाज नुवान झोयसा यांचं निलंबन करण्यात आलं आहे. त्यांच्यावर आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) मॅच-फिक्सिंग आणि गैरव्यवहार केल्याचे आरोप ठेवले असून, त्यांना निलंबित करण्यात आले आहे. आयसीसीनेच पत्रकाद्वारे ही माहिती दिली आहे.


 
आरोपांवर उत्तर देण्यासाठी झोयसा यांना 1 नोव्हेंबर 2018 पासून 14 दिवसांची मुदत देण्यात आली आहे. झोयसा यांच्यावर सामन्याच्या निकालावर प्रभाव टाकणे, खेळाडूंना आयसीसीच्या भ्रष्टाचार नियमाचं उल्लंघन करण्यासाठी उकसवणे, आणि लाचलुचपत प्रतिबंधक समितीला खरं उत्तर न देणं असे तीन गंभीर आरोप लावण्यात आले आहेत.

यापूर्वी, श्रीलंकेचा माजी धडाकेबाज सलामीवीर सनथ जयसूर्यावरही आयसीसीने भ्रष्टाचाराचे आरोप लावले आहेत. आयसीसीच्या 2.4.6 या कलमानुसार जयसूर्यावर भ्रष्टाचारविरोधी पथकाला मदत न केल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्याचबरोबर कलम 2.4.7नुसार कारवाईमध्ये बाधा आणण्याचा आरोपही करण्यात आला आहे.