ऑस्ट्रेलिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका कसोटीत बॉल टॅम्परिंग प्रकरणावरुन निर्माण झालेलं वादळ शमतं न शमतं, तोच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये बॉल टॅम्परिंगचा आणखी एक प्रकार समोर आला आहे. वेस्ट इंडिज विरुद्ध श्रीलंका कसोटी सामन्यात, लंकेचा कर्णधार दिनेश चंडीमलवर बॉल टॅम्परिंग केल्याचा आरोप ठेवण्यात आलेला आहे. सेंट लुशिया येथे खेळवण्यात येत असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात हा प्रकार घडला असून, श्रीलंकन संघ व्यवस्थापनाने आपल्या खेळाडूंनी कोणतीही चुकीची गोष्ट केली नसल्याचं म्हटलं आहे.

आयसीसीने चंडीमलवर नियम क्रमांक 2.2.9 चं उल्लंघन केल्याचा ठपका ठेवलेला आहे. दुसऱ्या कसोटीच्या तिसऱ्या दिवशीच्या खेळात, श्रीलंकन खेळाडूंनी मैदानात न उतरण्याचा निर्णय घेतल्यामुळे सामना सुरु होण्यासाठी दोन तास विलंब झाला होता. या कारणासाठी दोन्ही पंचांनी श्रीलंकेला 5 धावांचा दंडड ठोठावला होता.

श्रीलंकन क्रिकेट बोर्डाने या प्रकरणी आपल्या खेळाडूंना संपूर्ण पाठींबा दिला आहे. आमच्या संघातील कोणत्याही खेळाडूने चुकीचं काम केलं नसून, लंकन क्रिकेट बोर्ड आपल्या खेळाडूंच्या पाठीमागे ठामपणे उभं असल्याचं, प्रसिद्धीपत्रकात म्हणलं आहे. याआधी बॉल टॅम्परिंग प्रकरणी दोषी आढळल्यानंतर ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टिव्ह स्मिथ, डेव्हीड वॉर्नर आणि कॅमरुन बँक्रॉफ्ट यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली होती. त्यामुळे आगामी काळात आयसीसी या प्रकरणी नेमकी काय भूमिका घेते हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.