वेस्ट इंडिजविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीत चेंडू कुरतडल्याप्रकरणी (बॉल टॅम्परिंग) श्रीलंकेचा कर्णधार दिनेश चंडीमलला आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) दोषी ठरवले आहे. आयसीसीने चंडीमलवर एका सामन्याच्या निलंबनाची कारवाई केली असून त्याचे सामन्याचे संपूर्ण मानधन दंड म्हणून ठोठावण्यात आले आहे.

सेंट लुशिया येथे श्रीलंका विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्यादरम्यान दिनेश चंडीमलने बॉल टॅम्परिंग केल्याचे समोर आले होते. आयसीसीने चंडीमलवर नियम क्रमांक २.२.९ चे उल्लंघन केल्याचा ठपका ठेवला होता. या प्रकरणी सामनाधिकारी जवागल श्रीनाथ यांनी मंगळवारी रात्री निर्णय दिला. ‘सामन्यातील व्हिडिओ फुटेज आम्ही तपासले असून यात चंडीमलने बॉल टॅम्परिंग केल्याचे स्पष्ट दिसते. चंडीमलने आयसीसीच्या नियमांचे उल्लंघन केल्याने त्यांच्यावर कारवाई करण्यात आली, असे श्रीनाथ यांनी सांगितले.

सुनावणीदरम्यान, चंडीमलने चेंडूला थुंकी लावल्याचे सांगितले. तो काही तरी खात होता, असेही त्याने सांगितले. पण त्याचा हा युक्तिवाद पुरेसा ठरला नाही. आयसीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डेव्हिड रिचर्डसन म्हणाले, आयसीसी सामनाधिकाऱ्यांच्या निर्णयाचे समर्थन करत असून आयसीसी नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाईसाठी कटीबद्ध आहे. अशा प्रकारांवर लगाम लावण्यासाठी बॉल टॅम्परिंगसाठी कठोर शिक्षेची तरतूद केली जाणार आहे. यासाठी आगामी महिन्यात होणाऱ्या बैठकीत चर्चा केली जाईल, असे सूत्रांनी सांगितले. दरम्यान, या कारवाईमुळे चंडीमल वेस्ट इंडिजविरुद्धच्या तिसऱ्या कसोटीला मुकणार आहे.