श्रीलंका संघातील दहा खेळाडूंनी सुरक्षेच्या कारणावरून पाकिस्तान दौऱ्यातून माघार घेतली आहे. सप्टेंबर-ऑक्टोबर दरम्यान श्रीलंका संघ पाकिस्तान दौऱ्यावर जाणार आहे. यामध्ये एकदिवसीय आणि टी-२० सामन्याची मालिका खेळवली जाणार आहे. पाकिस्तानच्या जिओ टीव्हीने श्रीलंका क्रिकेट बोर्डाच्या (एसएलसी) हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार, सुरक्षेच्या कारणावरून श्रीलंकेच्या दहा खेळाडूंनी पाकिस्तान दौऱ्यातून माघार घेतली आहे. यामध्ये श्रीलंकेचा वनडे सामन्याचा खेळाडू दिमुथ करुणारत्ने, टी-२० सामन्याचा कर्णधार लसिथ मलिंगा आणि माजी कर्णधार एंजलो मॅथ्यूज, निरोशन डिकवेला, कुसल परेरा, धनंजय डी सिल्वा, अकिला धनंजय, सुरंगा लकमल, दिनेश चंडीमल आणि दिमुथ करुणारत्ने यांचा समावेश आहे.

खेळाडूंच्या कुटुंबीयांनी खेळाडूंच्या सुरक्षेबद्दल चिंता व्यक्त केली असल्याची माहिती श्रीलंकेचे क्रीडा मंत्री हेरिन फर्नांडो यांनी दिली. या दौऱ्यापासून पाकिस्तानमध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेट पुन्हा सुरु व्हावं असा पीसीबीचा प्रयत्न आहे. पण अद्याप तरी श्रीलंकन खेळाडू या दौऱ्यासाठी तयार नसल्याने या दौऱ्याबाबत संभ्रम कायम आहे.

२००९ साली पाकिस्तानच्या दौऱ्यावर असताना लाहोर शहरात श्रीलंका क्रिकेट संघावर दहशतवाद्यांनी प्राणघातक हल्ला केला होता. या हल्ल्यात श्रीलंकेचे खेळाडू थोडक्यात बचावले होते. त्यानंतर पाकिस्तानमध्ये आंतरराष्ट्रीय सामन्यांचे आयोजन बंद झाले होते. २०१५ आणि २०१८ मध्ये झिम्बाब्वे आणि वेस्ट इंडिजच्या संघांनी वनडे मालिकांसाठी पाकिस्तानमध्ये सामने खेळले. मात्र, इतर कोणत्याही मोठ्या देशाच्या संघाने पाकिस्तानमध्ये सामने खेळण्यास नकार दिला आहे.

असा आहे दौरा –
एकदिवसीय सामने – २७, २९ सप्टेंबर आणि दोन ऑक्टोबर
टी-२० सामने – ५, ७ आणि ९ ऑक्टोबर