श्रीलंकेच्या दौऱ्यावर २०१०मध्ये आलेल्या भारतीय संघातील एका खेळाडूविरुद्ध लाचलुचपतविरोधी समितीने दिलेला अहवाल श्रीलंकेच्या क्रिकेट मंडळाने काढून घेतला, हा भारतीय क्रिकेट संघटक आय. एस. बिंद्रा यांनी केलेला आरोप या मंडळाने फेटाळून लावला आहे.
मंडळाचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी अ‍ॅश्ले डिसिल्वा यांनी हे आरोप फेटाळून लावले असून, असा कोणताही प्रकार या दौऱ्यादरम्यान घडलेला नाही, असे म्हटले. बिंद्रा यांच्या आरोपांमध्ये काहीही तथ्य नाही. असा कोणताही अहवाल आमच्याकडून भारतीय संघ व्यवस्थापनाकडे पाठविण्यात आलेला नाही. तसेच आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या लाचलुचपतविरोधी समितीकडेही असा कोणताही अहवाल पाठविण्यात आलेला नाही.

आरोपांमध्ये तथ्य आहे : बिंद्रा
‘‘मी केलेल्या आरोपांशी ठाम असून त्यामध्ये तथ्य निश्चित आहे,’’ असे बिंद्रा यांनी चंडीगढ येथे पत्रकारांना सांगितले. ते म्हणाले, ‘‘२०१०च्या दौऱ्यात एका भारतीय खेळाडूबरोबर एका तरुणीने रात्र काढली होती. या तरुणीचा सट्टेबाजांशी घनिष्ठ संबंध होता. आयसीसीने किंवा अन्य कोणत्याही संस्थेने अजूनही या प्रकाराची सखोल चौकशी करावी. याबाबत संपूर्ण सहकार्य करण्याची माझी तयारी आहे.’’

बीसीसीआयमधील चुकीच्या घटनांविरोधात लढाई -बिंद्रा
चेन्नईत झालेली बीसीसीआयच्या कार्यकारिणी समितीची बैठक हास्यास्पद असल्याचे सांगत ‘माझा लढा हा बीसीसीआयमध्ये जे काही चुकीचे घडत आहे त्याविरुद्ध आहे’, असे बिंद्रा यांनी सांगितले. ‘‘या बैठकीतून जे काही निष्पन्न झाले, त्यामुळे चाहते नाराज झाले आहेत. बीसीसीआयची प्रतिमा डागाळण्याचा हा प्रयत्न सुरू आहे. माझ्या कारकीर्दीत बीसीसीआयची पत इतकी घसरलेली नव्हती,’’ असे त्यांनी सांगितले.