कोलंबो : श्रीलंका क्रिकेट इतिहासातील सर्वोत्तम खेळाडूंपैकी एक वेगवान गोलंदाज लसिथ मलिंगाने सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती स्वीकारली आहे. वेगळी गोलंदाजीची शैली आणि उत्कृष्ट यॉर्करसाठी ओळखल्या जाणाऱ्या मलिंगाने मंगळवारी समाजमाध्यमावर संदेश लिहीत निवृत्तीची घोषणा केली.

‘‘मी यापुढे ट्वेन्टी-२० क्रिकेटही खेळणार नसून सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती स्वीकारत आहे. या सुंदर प्रवासात मला पाठिंबा देणाऱ्या सर्वांचे मी आभार मानतो. तसेच भविष्यात माझ्या अनुभवाचा उपयोग करत युवा क्रिकेटपटूंना मार्गदर्शन करण्यासाठी उत्सुक आहे,’’ असे मलिंगाने त्याच्या ‘ट्वीट’मध्ये म्हटले. त्याने यावर्षी जानेवारीमध्ये कसोटी आणि एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती. आता त्याने ट्वेन्टी-२० क्रिकेटलाही अलविदा केले आहे. मलिंगाने ३० कसोटी सामन्यांत १०१ बळी, २२६ एकदिवसीय सामन्यांत ३३८ बळी आणि ८४ ट्वेन्टी-२० सामन्यांत १०७ बळी घेतले होते.