क्रिकेटमध्ये भागीदारी ही एक महत्वाची गोष्ट असते. मैदानावर फलंदाजांमध्ये जितकी तगडी भागीदारी होईल तितकी संघाची धावसंख्या जास्त करण्यास हातभार लागतो. गोलंदाजांमध्येही दोन्ही बाजूने चांगली भागीदारी झाल्यास फलंदाजांना अडचण निर्माण करण्यास मदत होते. ही भागीदारी केवळ मैदानापुरती मर्यादित राहत नाही. मैदानाबाहेर ही भागीदारी मैत्रीच्या रूपाने दिसून येते. क्रिकेटमध्ये सचिन तेंडुलकर-विनोद कांबळी, युवराज सिंग-हरभजन सिंग यासारख्या अनेक क्रिकेटपटूंचे मैत्रीचे किस्से सर्वानाच परिचयाचे आहेत.

याच मित्राच्या जोडीतील आणखी एक जोडी म्हणजे श्रीलंकेचे कुमार संगकारा आणि मुथय्या मुरलीधरन. संगकारा हा मैदानावर आपल्या फलंदाजीने धावांचा डोंगर उभारायचा. तर मुथय्या मुरलीधरन हा आपल्या फिरकीच्या जाळ्यात फलंदाजाना लीलया गुंडाळायचा. पण मैदानावर जरी हे दोघे अतिशय गंभीर दिसत असले, तरी मैदानाबाहेर मात्र हे दोघे मस्ती, मजा करत असायचे. संगकारानेच हे गुपित उघड केले आहे.

एका मुलाखती दरम्यान संगकाराने मुरलीधरन आणि त्याच्या मैत्रीचे अनेक किस्से सांगितले. या दरम्यान, मुरलीधरन हा आपल्याला झोपू द्यायचा नाही, असा आरोपही त्याने केला आहे. ‘आम्ही अनेकदा दौऱ्यासाठी बाहेर जायचो. त्यावेळी मी आणि मुरलीधरन आम्ही एकाच खोलीत असायचो. मी झोपलेलो असेल, तरीही मुरलीधरन मला कार्टून बघायला उठवायचा आणि त्याच्यासोबत कार्टून बघायला लावायचा’, असे संगकाराने सांगितले.

मुर्लीधरनला टीव्ही पाहायला खूप आवडतो. दौऱ्यावर असताना तो कायम टीव्ही हि पाहत असायचा आणि टीव्हीवर काय सुरु आहे? ते सतत मला सांगत राहायचा. त्यामुळे माझी सतत झोपमोड होत असे. त्यामुळे मुरलीधरनसाठी मी अनेक रात्री जागलोय, असे म्हटले तरीही चालेल, असंदेखील संगकारा म्हणाला.