जगभरात करोना विषाणूमुळे निर्माण झालेली परिस्थिती अद्याप नियंत्रणात आलेली नाही. या परिस्थितीचा फटका जगभरातील क्रीडा विश्वाला बसला आहे. मात्र लॉकडाउन काळात स्पर्धा रद्द होत असल्यामुळे होणारं आर्थिक नुकसान भरुन काढण्यासाठी आता प्रेक्षकांविना स्पर्धा खेळवण्याचा विचार सुरु झाला आहे. १६ मे पासून जर्मनीत Bundesliga ही स्पर्धा खेळवण्यात येणार आहे. आयसीसीनेही क्रिकेट स्पर्धा सुरु व्हाव्याच यासाठी प्रयत्न सुरु केलेत. भारतीय संघ जुलै महिन्यात श्रीलंका दौऱ्यावर जाणार होता. मात्र सध्याची परिस्थिती पाहता, हा दौरा रद्द होण्याची शक्यता जास्त आहे. मात्र भारतीय संघाने ही मालिका खेळावी यासाठी श्रीलंकन क्रिकेट बोर्ड आग्रही आहे.

‘The Island’ ने दिलेल्या वृत्तानुसार, लंकन क्रिकेट बोर्डाने इ-मेल वरुन बीसीसीआयला जुलै महिन्यात होणाऱ्या दौरा खेळण्याविषयी विनंती केल्याचं समजतंय. हा दौरा पार पडण्यासाठी श्रीलंकन क्रिकेट बोर्ड खेळाडूंना क्वारंटाइन सुविधा निर्माण करुन देण्यापासून सुरक्षिततेची सर्व काळजी घ्यायला तयार आहे. याचसोबत खबरदारीचा उपाय म्हणून ही मालिका प्रेक्षकांविना खेळवण्याची तयारीही लंकन बोर्डाने दाखवली आहे. मात्र केंद्र सरकारकडून लॉकडाउन संदर्भात कोणताही निर्णय आल्याशिवाय बीसीसीआय याबद्दल निर्णय घेण्याच्या तयारीत नसल्याचं समजतंय.

अवश्य वाचा – क्रिकेटची गाडी रुळावर आणण्यासाठी BCCI चे प्रयत्न सुरु, मोठा निर्णय घेण्याची तयारी

सध्या सर्व क्रिकेट बोर्डांना करोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा फटका बसला आहे. भारतीय संघाने श्रीलंकेचा दौरा केल्यास लंकन क्रिकेट बोर्डासाठी हा दौरा आर्थिक दृष्टीकोनातून फायदेशीर ठरणार आहे. मात्र त्यासाठी भारतातील केंद्र सरकार लॉकडाउनसंदर्भात काय निर्णय घेतं याची वाट पहावी लागणार आहे.

अवश्य वाचा – टी-२० विश्वचषकाऐवजी आयपीएल खेळण्याला रवी शास्त्रींचा पाठींबा