पाकिस्तानात खेळवल्या जात असलेल्या टी २० आणि एकदिवसीय मालिकेसाठी श्रीलंकेच्या १० खेळाडूंनी माघार घेतल्यानंतर श्रीलंकन क्रिकेट मंडळाने राखीव खेळाडू असलेला ब- संघ पाकिस्तानात पाठवला. श्रीलंकेच्या खेळाडूंच्या सरक्षेत कोणतीही कमतरता राहू नये म्हणून पाकिस्तान क्रिकेट मंडळाने त्यांना राष्ट्रपतींना पुरवण्यात येणाऱ्या दर्जाची सुरक्षा पुरवली आहे. श्रीलंकेच्या खेळाडूंना ईतकी कडेकोट सुरक्षा पुरवण्यात आली आहे की त्या सुरक्षेकडे पाहता त्या विभागात कर्फ्यू लावण्यात आला आहे की काय असे तेथील नागरिकांना वाटते आहे. सध्या श्रीलंकन क्रिकेट संघाला पुरवण्यात आलेल्या सुरक्षेबाबतचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

भारताचा माजी क्रिकेटपटू आणि भाजप खासदार गौतम गंभीर याने तो व्हिडीओ स्वत:च्या ट्विटरवर पोस्ट केला आहे. तो व्हिडीओ पाहिल्यावर पाकिस्तानी नागरिकाने व्हिडीओ शूट केल्याचे समजते. त्या व्हिडीओमध्ये श्रीलंकेच्या क्रिकेट संघाला सुरक्षा पुरवणाऱ्या सुरक्षा व्यवस्थेत तब्बल ३५-३६ वाहनांचा समावेश असल्याचे दिसते आहे. तसेच ‘कर्फ्यू लावून क्रिकेटचे सामने कसे खेळावेत हे पाकिस्तानातच कळेल’ अशा शब्दात पाकिस्तानी नागरिकांकडूनच या सुरक्षाव्यवस्थेची खिल्ली उडवल्याचेही या व्हिडीओतील संभाषण ऐकल्यावर समजते आहे.

गौतम गंभीरने हा व्हिडीओ पोस्ट केला असून त्यावर एक झकास कॅप्शन दिले आहे. ‘पाकिस्तानचे लोक काश्मीरच्या मुद्द्याच्या मागे इतके व्यस्त झाले की त्यांना कराचीचा विसर पडला’ असे कॅप्शन गंभीरने दिले. दरम्यान, सामन्याच्या वेळी स्टेडिअमच्या बाहेर आणि आतमध्ये प्रेक्षकांवर नजर ठेवण्यासाठी सशस्त्र सुरक्षारक्षकदेखील ठेवण्यात आले होते.