कोलंबो : सध्या श्रीलंकन क्रिकेटमध्ये होत असलेल्या सामनानिश्चितीच्या आरोपांमुळे श्रीलंकन क्रिकेट मंडळ पुरते हादरले असून सामनानिश्चितीप्रकरणी दोषी आढळणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यासाठी ते नवीन कायदा आणण्याच्या प्रयत्नात आहेत. सामनानिश्चिती प्रकरणाच्या चौकशीसाठी श्रीलंकेला मदत करण्याची तयारी भारताने दर्शवली असल्याचे श्रीलंकेचे कॅबिनेट मंत्री अर्जुन रणतुंगा यांनी सांगितले.

श्रीलंकेचे माजी क्रिकेटपटू आणि पेट्रोलियममंत्री असलेले रणतुंगा म्हणाले की, ‘‘क्रिकेटमधील भ्रष्टाचाराचे आरोप सिद्ध करण्यासाठी भारताच्या केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) तांत्रिक सहकार्य करण्याचे आश्वासन दिले आहे. या परिस्थितीला योग्य प्रकारे तोंड देण्यासाठी आमच्याकडे तज्ज्ञांची फौज अथवा तशा प्रकारचा कायदा उपलब्ध नाही. भारताने आम्हाला सामनानिश्चितीप्रकरणी कायदा करण्यासाठी मदत करण्याची तयारी दर्शवली आहे.’’

सीबीआयने याआधी २००० मधील सामनानिश्चितीप्रकरणी अर्जुन रणतुंगा आणि अरविंद डिसिल्वा यांची चौकशी केली होती; पण या दोघांनी कोणतेही गैरकृत्य केले नसल्याचे चौकशीदरम्यान समोर आले होते. मे महिन्यात एका वृत्तवाहिनीने क्रिकेटमधील जागतिक भ्रष्टाचाराबद्दलचा लघुपट प्रसिद्ध करत खळबळ उडवून दिली होती. गॉल स्टेडियममधील कर्मचारी थारंगा इंडिका आणि व्यावसायिक क्रिकेटपटू थारिंडू मेंडिस यांच्यावर सामनानिश्चितीचे आरोप लावण्यात आले होते. इंग्लंडविरुद्धचा कसोटी सामना चार दिवसांत निकाली काढण्याच्या हेतूने त्यांनी खेळपट्टी तयार केली होती, असा आरोप त्यांच्यावर लावण्यात आला आहे. या प्रकरणाची चौकशी आयसीसीकडून होत असल्यामुळे या दोघांवर तसेच एक प्रशिक्षक जीवंथा कुलातुंगा याच्यावर श्रीलंका क्रिकेट मंडळाने बंदी घातली आहे.

याप्रकरणी १९९६ च्या विश्वचषक विजेत्या संघातील सदस्य सनथ जयसूर्यासह अन्य काही जणांची आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या भ्रष्टाचारविरोधी पथकाकडून चौकशी सुरू आहे. सामनानिश्चितीच्या आरोपांप्रकरणी सहकार्य करत नसल्याचा ठपका आयसीसीने जयसूर्यावर ठेवला आहे.