भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यातही पहिली कसोटी आता अनिर्णित अवस्थेकडे झुकणार हे निश्चित झालं आहे. चौथ्या दिवसाच्या अखेरीस भारताने दुसऱ्या डावात दमदार पुनरागमन करत ४९ धावांची आघाडी घेतली आहे. पहिल्या डावात श्रीलंकेने १२२ धावांची आघाडी घेतल्यानंतर भारतीय फलंदाजांनी दुसऱ्या डावात अतिशय सावधपणे फलंदाजी केली. खेळपट्टीवर जम बसल्यानंतर शिखर धवन आणि लोकेश राहुल जोडीने श्रीलंकन गोलंदाजीवर आक्रमण करायला सुरुवात केली. दोघांमध्ये पहिल्या विकेटसाठी १६६ धावांची शतकी भागीदारी झाली. यावेळी शिखरने मैदानाच्या चौफेर फटकेबाजी करत भारताच्या पुनरागमनात मोलाचा हातभार लावला. मात्र आपल्या शतकासाठी ६ धावा हव्या असताना शिखर झेलबाद होऊन माघारी परतला. यानंतर पंचांनी अंधुक प्रकाशामुळे दिवसाचा खेळ थांबवला. चौथ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा लोकेश राहुल ७३ तर चेतेश्वर पुजारा २ धावांवर खेळत होता. चौथ्या दिवसाअखेरीस भारताने १७१ धावांपर्यंत मजल मारली आहे.

श्रीलंकेचे गोलंदाज दुसऱ्या डावात भारताच्या फलंदाजीवर अंकुश ठेवण्यात अपयशी ठरले. सुरंगा लकमल, दसुन शनका, गमगे, रंगना हेरथ यापैकी एकाही गोलंदाजाला भारताची जमलेली जोडी फोडता आली नाही. अखेर दसुन शनकाने शिखर धवनला माघारी धाडत श्रीलंकेच्या संघाला पहिलं यश मिळवून दिलं. त्यामुळे पाचव्या दिवशीच्या खेळात दोन्ही संघ कसे खेळतायत हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

  • चौथ्या दिवसाच्या अखेरीस भारताची परिस्थिती १७१/१
  • सलग चौथ्या दिवशी अंधुक प्रकाशामुळे पंचांनी खेळ थांबवला
  • शतकापासून अवघ्या ६ धावा दूर असताना शिखर धवन माघारी, भारताला पहिला धक्का
  • दुसऱ्या डावात श्रीलंकेचे गोलंदाज हतबल, शिखर धवनकडून मैदानात चौफेर फटकेबाजी
  • पहिल्या विकेटसाठी दोघांमध्येही शतकी भागीदारी
  • पहिल्या विकेटसाठी भारतीय सलामीवीरांची शतकी भागीदारी, राहुल पाठोपाठ शिखर धवनचंही अर्धशतक
  • लोकेश राहुलचं अर्धशतक, भारताने ओलांडला शंभर धावांचा टप्पा
  • चहापानानंतर भारताची सामन्यावर पकड कायम
  • चहापानापर्यंत भारताची धावसंख्या ७०/०
  • शिखर धवन-लोकेश राहुल जोडीने भारताचं अर्धशतक फलकावर लावलं
  • दुसऱ्या डावात भारताची सावध सुरुवात
  • पहिल्या डावात श्रीलंकेच्या २९४ धावा, लंकेकडे १२२ धावांची आघाडी
  • सुरंगा लकमलचा त्रिफळा उडवत शमीने श्रीलंकेचा डाव संपवला
  • ६७ धावांवर शमीकडे झेल देत रंगना हेरथ माघारी, श्रीलंकेला नववा धक्का
  • रंगना हेरथचं अर्धशतक, श्रीलंकेची आघाडी शंभरीपार
  • लंच टाईमनंतर श्रीलंकन फलंदाजांकडून भारतीय गोलंदाजीचा नेटाने सामना
  • चौथ्या दिवसाच्या लंच टाईमपर्यंत श्रीलंकेची अवस्था २६३/८, लंकेकडे ९१ धावांची आघाडी
  • सुरंगा लकमलच्या जोडीने रंगना हेरथची झुंज सुरुच
  • मात्र पेरेराला साहाकरवी बाद करत शमीने श्रीलंकेची जमलेली जोडी फोडली
  • दोघांमध्ये आठव्या विकेटसाठी ४२ धावांची भागीदारी, लंकेची आघाडी ५० धावांच्या वर
  • रंगना हेरथ आणि दिलरुवान पेरेरा जोडीकडून भारतीय गोलंदाजांचा नेटाने सामना
  • ठराविक अंतराने कर्णधार दिनेश चंडीमल साहाकडे झेल देत माघारी, शमीचा श्रीलंकेला सातवा धक्का
  • दसुन शनकाला भुवनेश्वर कुमारने धाडलं माघारी, लंकेला सहावा धक्का
  • डिकवेला शमीच्या गोलंदाजीवर माघारी, लंकेला पाचवा धक्का
  • मात्र भारतीय आक्रमणासमोर लंकेची मधली फळी कोलमडली
  • दोघांमध्ये अर्धशतकी भागीदारी
  • निरोशन डिकवेला आणि दिनेश चंडीमलच्या खेळीने लंकेची भारतावर आघाडी
  • चौथ्या दिवसाच्या खेळाला सुरुवात