कोलकाता कसोटी अनर्णित राहिल्यानंतर नागपूर कसोटीत भारताने श्रीलंकेला सामन्यात बॅकफूटलला ढकलण्यास सुरुवात केलेली आहे. श्रीलंकेनं दिलेलं २०५ धावांचं आव्हान पार करत भारताने पहिल्या डावात श्रीलंकेवर आघाडी घेतली आहे. दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा भारताने २ गड्यांच्या मोबदल्यात ३०४ धावांपर्यंत मजल मारली होती. सध्या भारताकडे १०७ धावांची आघाडी असून तिसऱ्या दिवसाच्या सुरुवातीला या आघाडीत भर टाकण्याकडे भारतीय संघाचा कल असणार आहे. नागपूर कसोटीचा दुसरा दिवस गाजवला तो भारताच्या फलंदाजांनी. मुरली विजय आणि चेतेश्वर पुजारा जोडीने सुरुवातीला सावध पवित्रा घेत नंतर सामन्यावर आपली पकड घट्ट केली. दोघांनीही दुसऱ्या विकेटसाठी २०९ धावांची द्विशतकी भागीदारी केली. या खेळीदरम्यान मुरली विजयने आपलं शतकही साजरं केलं.

अथक प्रयत्नानंतर अखेर श्रीलंकेच्या रंगना हेरथने मुरली विजयचा अडसर दूर करत श्रीलंकेला दिवसातलं पहिलं यश मिळवून दिलं. मात्र यानंतर मैदानात आलेल्या कर्णधार विराट कोहलीने चेतेश्वर पुजाराच्या साथीने झुंज कायम ठेवत भारताला १०० पेक्षा जास्त धावांची आघाडी मिळवून दिली. यादरम्यान चेतेश्वर पुजारानेही कोहलीच्या मदतीने आपलं शतक साजरं केलं. त्याला विराट कोहलीनेही उत्तम साथ देत अर्धशतकी खेळी केली. त्यामुळे तिसऱ्या दिवसाच्या सुरुवातीला श्रीलंकेचा संघ कशी कामगिरी करतो हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

  • तिसऱ्या दिवसाच्याअखेरीस भारताची धावसंख्या ३१२/२, एकूण आघाडी १०७ धावा
  • भारताकडे १०० पेक्षा जास्त धावांची आघाडी
  • विराट कोहलीची चेतेश्वर पुजाराला उत्तम साथ, कोहलीनेही साजरं केलं अर्धशतक
  • विजय बाद झाल्यानंतर चेतेश्वर पुजाराचं संयमी शतक, भारत सामन्यात वरचढ
  • चेतेश्वर पुजाराने विराट कोहलीच्या साथीने भारताची झुंज सुरु ठेवली
  • मुरली विजय – चेतेश्वर पुजारामध्ये दुसऱ्या विकेटसाठी २०९ धावांची भागीदारी
  • अखेर रंगना हेरथने भारताची जमलेली जोडी फोडली, मुरली विजय माघारी
  • पुजारा-मुरली विजयची दुसऱ्या विकेटसाठी नाबाद द्विशतकी भागीदारी
  • श्रीलंकेने दिलेलं आव्हान भारताकडून पार, पहिल्या डावात लंकेवर आघाडी
  • मैदानात मुरली विजयीच चौफेर फटकेबाजी, चेतेश्वर पुजाराचीही विजयला उत्तम साथ
  • चहापानापर्यंत भारताची सामन्यावर पकड, मुरली विजयचं शतक
  • मुरली विजयपाठोपाठ चेतेश्वर पुजाराचंही अर्धशतक, श्रीलंकेचे गोलंदाज हतबल
  • मुरली विजयची मैदानात चौफेर फटकेबाजी, दोघांमध्ये दुसऱ्या विकेटसाठी नाबाद शतकी भागीदारी
  • दोनही फलंदाजांकडून लंकेच्या गोलंदाजांचा चांगलाच समाचार
  • उपहारापर्यंत दोघांमध्ये ९० धावांची नाबाद भागीदारी
  • दुसऱ्या दिवसाच्या पहिल्या सत्रापर्यंत भारताची धावसंख्या ९७/१
  • दुसऱ्या बाजूने चेतेश्वर पुजाराची मुरली विजयला मोलाची साथ
  • मुरली विजयचं संयमी अर्धशतक, श्रीलंकेच्या गोलंदाजांचा नेटाने सामना
  • दोन्ही फलंदाजांचा खेळपट्टीवर जम
  • चेतेश्वर पुजारा-मुरली विजय जोडीकडून सावधपणे खेळाला सुरुवात
  • दुसऱ्या दिवसाच्या खेळाला सुरुवात